औरंगाबाद : सद्य:स्थितीत शहरावर संकट नाही; परंतु सध्या शहर संक्रमण काळातून जात आहे. स्मार्ट सिटी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पाणीपुरवठा योजना झाल्यानंतरचा येणारा काळ औरंगाबादसाठी चांगला असेल. सकारात्मक दृष्टीने विचार करून पावले उचलली जावीत, असे मत मावळते जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त एन. के. राम यांनी व्यक्त केले.
सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येताच, त्यांना भेटण्यासाठी अनेक शिष्टमंडळांनी गर्दी केली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. पत्रकारांशी त्यांनी तासभर गप्पा मारत वर्षभरात केलेल्या कामांबाबत तसेच पालिकेतील महिनाभराच्या अनुभवाचे कथन केले.
सर्वसामान्यांना सर्वाधिक वेळ राम यांनी वर्षभराच्या कार्यकाळात दिला. १५० कोटी रोडसाठी, ३०० कोटी स्मार्टसिटी, ९० कोटी कचरा व्यवस्थापन, ८०० कोटी समांतर जलवाहिनीसाठी, अशी कामे शहरात झाल्यानंतर संक्रमणातून मुक्तता झालेली दिसेल, असे राम म्हणाले.
> प्रश्न : वर्षभरातच बदली कशी काय झाली.- एन. के. राम : माझे शासनामध्ये स्रोत नाहीत. परंतु बदली होणार अशी कुणकुण लागली होती. परंतु बदली वर्षभरात कशी काय झाली, याबाबत मला काही सांगता येणार नाही. पण पुण्यासारख्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणे हे महत्त्वाचे आहे.
> प्रश्न : औरंगाबादेत कामाचा अनुभव क सा राहिला.- एन. के. राम : हे शहर व जिल्हा चांगला आहे. काम करण्याची संधी मिळाली. यवतमाळ-अमरावतीमधील कामाचा अनुभव बीडमध्ये कामी आला. औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी आणि पालिका या दोन्ही पदांवर काम करण्याचा अनुभव मिळाला. बीडमध्ये जलसंधारणाचे काम करण्याची संधी मिळाली.
> प्रश्न : पालिकेत काम करताना महिना कसा गेला.- एन. के. राम : मनपा कार्यक्षेत्रासाठी मोठे अधिकारी आहेत. साडेसात कोटींची कामे मंजूर केली. ७ कोटी कम्पोस्टिंगसाठी देता आले. कचरा व्यवस्थापनात चांगले काम करता आले. पालिकेचा प्रश्न कायमस्वरुपी मिटावा, यासाठी काम केले. पावसाळ्यापूर्वी कचऱ्याची समस्या पूर्णत: दूर होईल, असे वाटते आहे. तीन झोनमध्ये कचरा प्रक्रि येसाठी जागा नाही, त्या जागा लवकरच मिळतील.
> प्रश्न : पाणीपुरवठ्यासाठी काम करता आले काय.- एन. के. राम : पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी वेळ मिळाला नाही. शहरातील पाणीपुरवठा असमान आहे. त्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच बदलीचे आदेश आले.
> प्रश्न : महसूल प्रशासनातील कामाचा अनुभव कसा राहिला.- एन. के. राम : महसूल प्रशासनात काम करताना ई-म्युटिशन ९० टक्के केले. आॅनलाईन सातबारा पूर्ण होत आले आहे. येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर पाणीटंचाईचे आव्हान असणार आहे. समृद्धीसाठी ९०० हेक्टर जमीन दिली. सोलापूर- धुळे महामार्ग भूसंपादनाला गती दिली.
> प्रश्न : विभागीय आयुक्तांशी काही वाद होते काय?- एन. के. राम : विभागीय आयुक्त व माझ्यात काहीही वाद नव्हते. उपजिल्हाधिकारी कटके, गावंडे यांच्या निलंबनावरून वाद झाले. परंतु आयुक्तांकडून प्रशासकीय अनुभवाची शिदोरी मिळाली. औरंगाबादेत खूप काम करायचे होते, पण वेळ नाही मिळाला.