औरंगाबाद : व्यवहारात १० रुपयांच्या नाण्यांचा वापर करावा, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर आवाहन केले असतानाही ही नाणी बाद झाल्याच्या अफवेचे भूत अजूनही नागरिकांमध्ये कायम आहे. परिणामी, बँकेत १० रुपयांची नाणी जमा होत आहेत; पण घेऊन जाण्यास ग्राहक नकार देत असल्याने आजघडीला येथील बँकांमध्ये ५ कोटी रुपये मूल्य असलेली १० रुपयांची नाणी तिजोरीत पडून आहेत.
शहरात राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ करन्सीचेस्ट आहेत. याशिवाय प्रत्येक बँकेच्या शाखेमध्येही कमी अधिक प्रमाणात १० रुपयांची नाणी तिजोरीत पडून आहेत. ग्राहक या नाण्यांना हात लावण्यास तयार नाहीत. रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत की, ही नाणी बाद झाली नाही. ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांमधून शहरातील करन्सीचेस्टमध्ये १० रुपयांची नाणी येत आहे. अनेक ग्राहक ही नाणी स्वीकारत नसल्याने ती बँकेतच ठेवावी लागत आहेत.
यासंदर्भात एसबीआयच्या शहागंज शाखेचे मुख्य व्यवस्थापक दीनबंधू रॉय यांनी सांगितले की, बँकेच्या तिजोरीत १, २,५ व १० रुपयांची २ कोटी ९ लाखांपेक्षा अधिक मूल्यांची नाणी आहे. यात पावणेदोन कोटी मूल्यांच्या १० रुपयांच्या नाण्यांचा समावेश आहे. १,२ व ५ रुपयांची नाणी ग्राहक स्वीकारतात; पण १० रुपयांची नाणी घेत नसल्याने ही तिजोरीत पडून आहे. तसेच दुधडेअरी चौकातील एसबीआयच्या करन्सीचेस्टमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे आजघडीला १ कोटी ८७ लाख रुपयांची १० रुपये मूल्यांची नाणी आहे. ग्राहकांनी ही नाणी घेऊन जावी व व्यवहारात वापरावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नाणी जड असल्याचे ग्राहकांचे मतमोंढ्यातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, १, २, ५ व १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात बाजारात मुबलक प्रमाणात आहेत. यातील १० रुपयांची नाणी वजनाने जड असल्याने ग्राहक स्वीकारत नाहीत. ग्राहक म्हणतात की, खिशात पाचपेक्षा अधिक नाणी असतील, तर तो खिसा फाटण्याची शक्यता अधिक असते. जास्त नाणी असतील तर खिसा जड होतो, चालणेही कठीण जाते. तरीही शहरातील ग्राहक १० रुपयांची नाणी घेतात; पण ग्रामीण भागात अजूनही १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत.
रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण १० रुपयांची नाणी व्यवहारातून बाद झाली नाहीत. नागरिकांनी ही नाणी व्यवहारात वापरावीत, असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यासंदर्भातील आदेशपत्रही सर्व बँकांना प्राप्त झाले आहे. काही बँकांनी यासंदर्भात आपल्या शाखांमध्ये माहितीपत्रकही लावले आहे. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.