औरंगाबाद : गुरुवारी औरंगाबाद शहरात झालेल्या संततधार पावसाने महापालिकेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी महापालिका शहरात पॅचवर्कचे काम हाती घेणार आहे. औरंगाबादकरांना आणखी एक महिनाभर खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.
यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून मोठा पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी सकाळपासून औरंगाबादेत संततधार पावसाला सुरुवात झाली. मागील दोन महिन्यांपासून औरंगाबादकर पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पाऊस यावा म्हणून विशेष प्रार्थना घेण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सखल भागात पाणी शिरू नये म्हणून महापौर नंदकुमार घोडेले, महापालिकेचे अधिकारी उशिरापर्यंत शहरात गस्त घालत होते. ठिकठिकाणी झाड पडल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. टाऊन हॉल उड्डाणपुलावर बरेच पाणी साचले होते. पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाण्यामुळे वाहनधारकांन खड्डे अजिबात दिसत नाहीत. पुलावर सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत पाच ते सहा अपघात झाले. रात्री उशिरा अग्निशमन दलाने पुलावरील पाण्याला वाट मोकळी करून दिली. एलईडीचे दिवेही खाजगी कंपनीने सुरू केले.
शहरातील संततधार पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जालना रोडवर मुकुंदवाडी येथे मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सेव्हन हिल उड्डाणपुलावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. व्हीआयपी रोड म्हटल्या जाणाऱ्या मिलकॉर्नर, ज्युबिलीपार्क, आमखास, किलेअर्क, दिल्लीगेट येथे मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो, हे विशेष.
पॅचवर्कची जुनी निविदा मागील वर्षीही शहरात खड्ड्यांमुळे प्रचंड ओरड होत होती. महापौरांनी पावसाळा अखेरीस झोननिहाय निविदा काढण्याचे आदेश दिले होते. काही वॉर्डांमध्ये पॅचवर्क करण्यात आले. काही वॉर्डांमध्ये निविदा प्रक्रिया उशिराने राबविण्यात आली. त्यामुळे हे काम तसेच शिल्लक आहे. संबंधित कंत्राटदाराकडून मनपाला हे काम करून घ्यावे लागणार आहे. गणेशोत्सवापूर्वी हे काम सुरू होणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.