औरंगाबाद - अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे औरंगाबादमध्येही पडसाद उमटले आहेत. औरंगाबादमधील उस्मानपुरातील भाजपाचे कार्यालय फोडण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे तसेच मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन केले.
अहमदनगरमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. नगर शहरात पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह छिंदम याच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. पाथर्डी येथे जुने बसस्थानक चौकात बसवर दगडफेक करण्यात आली. श्रीगोंदा येथे तहसील कार्यालयावर सर्वपक्षियांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. भाजपाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जामखेड येथे शिवसेनेच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून भाजप व छिंदम यांचा निषेध करण्यात आला. पाथर्डी येथे पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीयांनी मोर्चा काढला. छिदम याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवप्रेमींनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला.
तर काही संतप्त तरुणांनी जुन्या बसस्थानक चौकात दगडफेक करुन एसटी बसच्या काचा फोडल्या. शेवगाव येथेही शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले़ भिंगार येथे सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला. उद्या भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे. केडगावमध्ये छिंदम याचा पुतळा जाळण्यात आला.
संगमनेर येथेही रास्तारोको करुन छिंदम याचा पुतळा जाळण्यात आला. राहुरी येथे नगर-मनमाड महामार्गावर सर्वपक्षियांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. दरम्यान पोलीस निरीक्षकांनी मध्यस्थी करीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. नेवासा येथे विविध संघटनांच्यावतीने छिंदम याचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला.