औरंगाबाद : काँग्रेससोबत ( Congress ) दगाबाजी करुन भाजपच्या ( BJP) मदतीने पंचायत समितीचे उपसभापती पद पटकावल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी अर्जून शेळके यांना पंचायत समिती कार्यालयातच बेदम मारहाण केली. या प्रकरणी सोमवारी मध्यरात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनुराग अप्पासाहेब शिंदे, विजय जाधव आणि अनोळखी सहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. ( Aurangabad Panchayat Samiti Deputy Speaker Arjun Shelke beaten by Congress members; charges were filed against six )
तक्रारदार अर्जून सुखदेव शेळके (४५, रा. सय्यदपुर) हे २०१७ साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. पंचायत समिती उपसभापती पदासाठी पक्षाकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी २८ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी २९ जुलै रोजी झालेल्या पंचायत समिती उपसभापती पदाच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले. त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनुराग शिंदे यांचा पराभव केला होता.
दरम्यान, २ जुलै रोजी दुपारी शेळके हे पंचायत समिती कार्यलयालत बसलेले होते. तेव्हा पराभूत उमेदवार अनुराग शिंदे हे विजय जाधव आणि अनोळखी सहा जणांसह तेथे गेले. शेळके यांनी त्यांना बसायला सांगितले. तेव्हा अचानक त्यांनी शेळके यांना शिवीगाळ करीत खुर्चीने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत ते केबीनमधून बाहेर पडत असताना त्यांना अडवून बेदम मारहाण करण्यात आली. पिंपळखुटाचे सरपंच पवन उदयसिंग बहुरे आणि उपसरपंच तुकाराम मन्साराम पडोळे हे भांडण सोडवित असताना त्यांनाही यावेळी मार लागला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पराभव जिव्हारी लागल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना स्टाईलने हल्ला केल्याची चर्चा सुरू झाली. याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री शेळके यांच्या तक्रारीवरून अनुराग शिंदे, विजय जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या ६ अनोळखींविरोधात गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंता तांगडे या तपास करीत आहेत.
पोलिसांनी केला घटनास्थळाचा पंचनामामंगळवारी दुपारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तुटलेल्या खुर्च्या आणि खिडक्यांच्या काचा जप्त केल्या. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी मोबाइलवर केलेले चित्रण पोलीस जप्त करणार आहेत. आरोपीविरोधात सबळ पुरावा गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
उपचार घेतल्यावर त्यांचाही इलाज करूएखाद्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर पराभूत उमेदवाराने त्यास मारहाण करण्याची ही पहिलीच घटना असावी. विजयी उमेदवाराने त्यांच्या दालनात आलेल्या पराभूत उमेदवारास बसण्यासाठी खुर्ची दिली. ते बेसावध असताना पराभूत उमेदवाराने त्यांच्यावरच हल्ला चढवला. अशा प्रवृत्तीमुळेच काँग्रेसची देशात पडझड झाली आहे. पहिले मारहाण झालेल्या आमच्या उपसभापतींवर दवाखान्यात उपचार केले जातील. त्यानंतर हल्ला करणारांचाही इलाज करण्यात येईल, असा इशारा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिला.
गद्दारी करणाऱ्यांना यापुढे माफी नाहीपंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या अर्जुन शेळके यांना कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यापुढे काँग्रेस पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही.- अनुराग शिंदे, पराभूत उमेदवार तथा सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस