औरंगाबाद : औरंगाबादकरांनी आज एका कर्मयोग्याचा सत्कार केला. ज्याने या पर्यटन नगरीला पुन्हा हवाईसेवेने जोडण्यासाठी निरपेक्ष प्रयत्न केले. ज्याच्या अथक प्रयत्नांमुळे आजघडीला औरंगाबादहून तब्बल १५ उड्डाणे होतात. सुनीत कोठारी हे कर्मयोगी ज्यांच्या प्रयत्नांनी हे शक्य झाले. त्यांच्या कामाचा गौरव शनिवारी औरंगाबाद फर्स्ट आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सुनीत कोठारी यांनी सांगितले की, मागील वर्षभराच्या अथक प्रयत्नांनंतर औरंगाबादेतून मुंबई, उदयपूर, हैदराबाद, अहमदाबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू करण्यात यश आले. आता चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच येथून थेट दुबई, थायलंड, श्रीलंकेसाठी विमानांनी उड्डाण करण्याचे औरंगाबादकरांचे स्वप्न पूर्ण होईल. कोठारी यांच्या या मनोदयानंतर उपस्थित उद्योजक, व्यापारी, सीए, वकील, डॉक्टरांसह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करून कोठारी यांच्या योगदानाला सलाम केला.
जेट एअरवेजची विमानसेवा बंद पडल्यानंतर पर्यटनाच्या राजधानीतून दुसऱ्या विमान कंपन्यांची देशांतर्गत सेवा सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे उद्योजक सुनीत कोठारी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित या सोहळ्यात औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, उद्योजक ऋषी बागला, उल्हास गवळी, गिरधर संगेरिया, प्रफुल्ल मालाणी, प्रितेश चटर्जी, मनीष अग्रवाल, सरदार हरिसिंग यांनी कोठारी यांचा नागरी सत्कार केला. तसेच विमानसेवा सुरू करण्यासाठी योगदान देणारेइंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटरचे अध्यक्ष प्रणब सरकार, उपाध्यक्ष राजीव मेहरा, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे व जसवंतसिंह राजपूत यांचाही सत्कार करण्यात आला.
सुनीत कोठारी यांनी सांगितले की, औरंगाबाद ही महाराष्ट्रातील पर्यटनाची राजधानी आहेच. शिवाय येथे औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय सेवेसाठीही महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे मोठे पोटेंशियल आहे. भारतातील नव्हे जगातील एक महत्त्वाचे ठिकाण औरंगाबाद आहे. मात्र, येथून कनेक्टिव्हिटीची समस्या होती. २० वर्षांपासून सुरू असलेली जेट एअरवेज विमानसेवा बंद पडली. तेव्हा संपर्क तुटल्यासारखे झाले. त्यानंतर आम्ही एअर इंडिया, ट्रू जेट आणि स्पाईस जेटची विमानसेवा सुरू करण्यात यश आले. येथून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर, उदयपूर या विमानसेवा सुरूआहेत. येत्या ५ फेब्रुवारीपासून इंडिगो कंपनी मुंबई, दिल्ली व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करीत आहे.
याशिवाय आम्ही देशांतर्गत नागपूर, पुणे, गोवा, जयपूर, चेन्नई, कोलकाता, वाराणसी, भोपाळ आदींसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच आग्राचा ताजमहाल ते औरंगाबादेतील दख्खन का ताजमहाल विमानसेवा सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.त्यांना येथील अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी बुद्धिस्ट सर्किटअंतर्गत बुद्धगया, भोपाळ, औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्ही केंद्र, राज्य सरकार व विमान कंपन्यांशी पाठपुरावा करीत आहोत. पूर्वी विमानाच्या येथून सहा फेºया होत होत्या. आता ३० पर्यंत वाढल्या आहेत. आता आम्ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा व कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यात दुबई, बँकॉक व कोलंबो अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास येथील पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळेल.
तसेच कार्गो सेवेमुळे मराठवाड्यातील औद्योगिक उत्पादने, शेतमाल मोठ्या प्रमाणावर निर्यात होईल, असेही कोठारी यांनी यावेळी नमूद केले. जर पर्यटनासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना व खेलो इंडियासारख्या खेळांचे आयोजन केले तर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी शहरात येईल, तसेच आॅटो एक्स्पो, एअर शो सुरू केले तर देशांतर्गत व विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात शहरात येतील, याकडेही त्यांनी औरंगाबादकरांचे लक्ष वेधले. डी. जी. साळवे यांनी सांगितले की, येथील विमानतळावर ५० विमाने ठेवण्याची क्षमता आहे. तर प्रणव सरकार यांनी सांगितले की, पर्यटनांच्या मागणीहून पर्यटनावरील जीएसटी २८ टक्क्यांहून १८ टक्के करण्यात आला आहे. प्रास्ताविक मानसिंग पवार यांनी केले. या वेळी राज्याचे माजी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा, खा. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.५ फेब्रुवारीला १५० गुंतवणूकदार येणार शहरातजसवंतसिंह राजपूत यांनी सांगितले की, येत्या ५ फेब्रुवारी रोजी स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स येथील १५० उद्योजक शहरात येणार आहेत. त्यांना सौरऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करायची आहे. त्यासाठी त्यांना आम्ही चित्तेगाव येथील सोलार प्लाँटमध्ये घेऊन जाणार आहोेत. तसेच शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आॅरिक सिटीलाही ते उद्योजक भेट देणार आहेत.इंधनावर शून्य टक्के व्हॅट करावाओरिसा सरकारने भुवनेश्वरला येणाºया आंतरराष्टÑीय विमानांच्या इंधनावर शून्य टक्के व्हॅट केला आहे. यामुळे तेथील विमानांची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. जेथे जेथे टुरिस्ट एअरपोर्ट आहेत तेथे तेथे राज्य सरकारने इंधनावर शून्य टक्के व्हॅट केला तर विमान कंपन्या आकर्षित होतील. यात औरंगाबादलाही फायदा होईल, असे सुनीत कोठारी यांनी सांगितले.मध्य प्रदेश सरकारने केला होता कोठारी यांचा गौरवउल्लेखनीय म्हणजे उद्योजक सुनीत कोठारी यांनी म. प्र.च्या तत्कालीन मंत्री यशोधरा राजे यांना मध्य प्रदेशातील पर्यटनवाढीसाठी काही शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार मध्य प्रदेश सरकारने उपाययोजना केल्यानंतर राज्यात येणाºया पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कोठारी यांना सन्मानित केले होते.