औरंगाबाद : जिल्ह्यातील १ लाख ६३ हजार मतदार ओळख पत्रांवरील छायाचित्र खराब झाले असून, त्यासाठी दुरुस्ती मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तसेच भागनिहाय मतदार यादी करताना कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच बुथवर आणि एकाच यादीत यावीत. यासाठीचे कामकाजही निवडणूक विभाग हाती घेणार आहे.
२०१९ च्या जानेवारी महिन्यापर्यंत मतदार नोंदणीचा कार्यक्रम असेल. त्यानंतर संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या अंतिम करण्याचे कामकाज सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाला आहे. जुलै ते सप्टेंबरपर्यंत मशिन्सची जमवाजमव करण्याची तयारी सुरू होईल, असेही सूत्रांनी सांगितले. गरजेपेक्षा १७५ पट मशिन्सची मागणी करण्यात आली होती.
२,५७७ मतदान केंद्रांची नोंद सध्या जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यानुसार बॅलेट व कंट्रोल युनिटच्या मागणीनुसार ४ हजारांच्या आसपास युनिट मिळतील. जिल्ह्यात २६ लाख ५० हजार ३७९ एकूण मतदार आहेत. त्यामध्ये १४ लाख ६ हजार ८२३ पुरुष आणि १२ लाख ४३ हजार ५३८ महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. चार वर्षांत जिल्ह्यामध्ये ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत.