औरंगाबाद : नामांकित आर. एल. स्टील्स ॲण्ड एनर्जी कंपनीला ३६ लाख १२ हजार २८७ रुपयांना फसविणाऱ्या टोळीतील एका आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली. या आरोपीचे बिहार कनेक्शन असून, त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
आर. एल. स्टील्स कंपनीच्या वित्त विभागाचे सरव्यवस्थापक विवेक घारे यांनी सायबर पोलीस ठाण्यात २२ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. गुन्हा नोंदवून निरीक्षक पातारे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक वारे आणि तांबे यांची पथके आठ दिवसांत आरोपींपर्यंत पोहोचली. राजकपूर सुग्रीव शुक्ला (३२, रा. जलालपूर, जिल्हा सिवान, राज्य बिहार) हा या आरोपीला पोलिसांनी अटक केली. तो एका खाजगी कंपनीत कामगार असून, त्यांच्या बँक खात्यात साडेचार लाख रुपये जमा झाल्याची माहिती तपासात पुढे आली. सायबर पोलिसांच्या एका पथकाने राजकपूर शुक्ला यास बिहारला जाऊन बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात त्याचे अन्य साथीदारही आहेत. निरीक्षक पातारे, सहायक निरीक्षक सातोदकर, उपनिरीक्षक वारे, तांबे, हवालदार खरे, सांबळे, नाईक सुशांत शेळके, संदीप पाटील, राम काकडे, रिजया शेख, अमोल सोनटक्के, गोकुळ कुतरवाडे, विजय घुगे, वैभव वाघचाैरे, रवी पोळ, संगीता दुबे, सोनाली वडनेरे यांच्या पथकांनी ही कामगिरी केली.
काय आहे प्रकरण?आर. एल. स्टील्स ॲण्ड एनर्जी कंपनीचे संचालक नितीन गुप्ता यांच्या नावाच्या ईमेल आयडीवरुन पंजाब नॅशनल बँकेस २२ नोव्हेंबर रोजी एक मेल आला. त्या मेलमध्ये कंपनीच्या लेटरहेडवर रणजितकुमार गिरी, मनोज कुमार, प्रसून दास आणि शंकर सैन यांच्या बँक खात्यात ३६ लाख १२ हजार २८७ रुपये ट्रान्सफर करण्यासह नवीन धनादेश पुस्तक देण्याचीही विनंती करण्यात आली. या मेलनुसार बँकेचे अधिकारी राहुल गिरे यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र कुमार गुप्ता यांच्या फोनवर संपर्क करुन नवीन धनादेश पुस्तक देण्याची विनंती अर्ज प्राप्त झाला असून, तो तुम्हीच केला आहे का, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी दुजोरा दिला. त्यानंतर कोणतीही शहानिशा न करता बँक अधिकाऱ्यांनी संबंधित चार खात्यात ३६ लाख रुपये ट्रान्सफर केले. कंपनीचे प्रतिनिधी रुपसिंग राजपूत यांना विनंती अर्जानुसार झालेल्या व्यवहाराच्या धनादेशावर स्वाक्षरी रकमा टाकण्यास सांगितले. तेव्हा राजपूत यांच्या लक्षात आले की, कंपनीने असा कोणताही मेल केला नव्हता. त्यानंतर या प्रकरणी तक्रार देण्यात आली.
पापा से बात हुआ क्या?सायबर गुन्हेगारांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र कुमार गुप्ता यांचा मुलगा नितीन गुप्ता यांच्या नावाने फेक मेल बँकेला केला. काही वेळाने नितीन गुप्ता यांच्या नावाने बँकेत फोन करून 'मै नितीन गुप्ता बोल रहा हूँ, आप का पापा से बात हुआ क्या?' असे विचारले. त्याअगोदरच बँक अधिकाऱ्याचे नरेंद्र कुमार गुप्ता यांच्यासोबत बोलणे झाले होते. दोन्ही संभाषणामुळे बँक अधिकारीही फसल्याचे समोर आले.