औरंगाबाद : शहरातील महिला, तरुणी, विद्यार्थिनींची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, समस्या, मंगळसूत्र हिसकावणे, महाविद्यालयात तरुणांकडून होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे. एक पथक कार्यरत असताना शहरातील वाढत्या घटना लक्षात घेऊन दुसरे पथक स्थापन करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी घेतला आहे. दोन्ही परिमंडळात प्रत्येकी एक पथक कार्यरत असणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १३४ महिला विषयक गुन्ह्यांचे निर्जनस्थळे, कॉलेज, शाळा, मुलींचे वसतिगृह, अभ्यासिका, क्लासेस, वृद्धाश्रम, अनाथालय, गर्दीचे ठिकाणी गस्त घालण्याचे काम दामिनी पथक करीत असते. त्याचवेळी नियंत्रण कक्ष, ज्येष्ठ नागरिक कक्षाला येणाऱ्या दुरध्वनीवरुन प्राप्त कॉलची दखल घेऊन वेळोवेळी मदतही करण्याचे कामही दामिनी पथकाकडे सोपविण्यात आलेले आहे. त्याशिवाय शाळा, महाविद्यालयात स्वसंरक्षण, सोशल मिडियाचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करणारी व्याख्यानांचे आयोजनही दामिनी पथकाकडून करण्यात येते.
शहरातील वाढणाऱ्या घटना, लोकसंख्या पाहता एक दामिनी पथक अपुरे पडत होते. त्यात वाढ करण्याची मागणी विविध सामाजिक संस्था, संघनांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेत आयुक्तांनी २४ ऑगस्ट रोजी आदेश देत आणखी एक पथकाची स्थापना केली आहे. त्यासाठी एक वाहन, दोन महिला अंमलदार आणि एक पुरुष पोलिसाची नेमणूक केली आहे. दोन्ही पथकाच्या कामाची विभागणी केली असून, एक पथक परिमंडळ १ आणि दुसरे पथक परिमंडळ २ मध्ये कार्यरत राहणार आहेत. ही दोन्ही पथके सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या नेतृत्वात कार्य करणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही पथकात एक अधिकारी आणि सात महिला अंमलदार, एक पुरुष अंमलदार असणार आहेत.
मदतीसाठी संपर्काचे आवाहनमहिला, मुली यांना आपत्कालीन परिस्थिती पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ सह नियंत्रण कक्ष, पोलिसांच्या व्हाटस्अपवर संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. ही पथके आयुक्त डॉ. गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते आणि सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात काम करतील, असेही निरीक्षक आघाव यांनी सांगितले.