औरंगाबाद : कोरेगाव- भीमाच्या घटनेनंतर शहरातील विविध ठिकाणी दगडफेकीच्या ५० घटना घडल्या. यामध्ये पोलिसांची १७ तर सामान्यांची ११७ वाहनांची तोडफोड करण्यात आली. शिवाय तीन अॅम्ब्युलन्सनाही लक्ष्य करण्यात आले. याशिवाय दंगेखोरांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत ४४ पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी विविध ठाण्यात तब्बल ४० गुन्हे नोंदवून आतापर्यंत ७४ जणांना अटक केली.
याविषयी अधिक माहिती देताना प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले की, शहराची भौगोलिक परिस्थिती आणि येथील अधिकाºयांची माहिती नव्हती. असे असताना दंगलसदृश परिस्थितीचा सामना करताना तीन पोलीस उपायुक्त, आठ सहायक आयुक्त आणि विविध ठाण्याच्या निरीक्षकांनी आपल्याला वेळोवेळी योग्य माहिती दिल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. बुधवारी सायंकाळनंतर शहर पूर्वपदावर आले. उस्मानपुरा, पीरबाजार, शंभूनगर, गारखेडा, सिद्धार्थनगर, हडको आणि आंबेडकरनगर या प्रमुख ठिकाणी उद्रेक झाला होता.
कोरेगाव-भीमातील घटनेप्रकरणी पहिल्या दिवशी संताप व्यक्त करणे आम्ही समजू शकलो. मात्र त्यानंतर सलग दोन दिवस पोलिसांवर आणि सामान्यांच्या वाहनांवर दगडफेक करणे, वाहने जाळण्याचे प्रकार घडत असल्याचे पाहून आम्ही कायदा हातात घेणा-यांना धडा शिकविण्याचे आदेश दिले. एसआरपी जवान आणि स्थानिक पोलिसांना जमावावर लाठीचार्ज, अश्रुधुराचे नळकांडे फोडण्याचे आणि वेळप्रसंगी हवेत डमी गोळीबार करण्याचे आदेश दिले. शिवाय मंगळवारी मध्यरात्रीपासून शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने अफवांचे पीक संपण्यास मदत झाली आणि दंगलसदृश एरियावरच लक्ष्य केंद्रित करण्यात आम्हाला वेळ मिळाला. प्रमुख ठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन राबवून आम्ही दंगेखोरांना अटक केली.