औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनचे आगामी वर्षभरात संपूर्ण रूप पालटणार आहे. दहा कोटी रुपयांच्या खर्चातून अजिंठा-वेरूळ लेणीच्या धर्तीवर रेल्वेस्टेशन परिसराचा विकास केला जाणार आहे. यामध्ये रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार असून, दोन महिन्यांत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असे ‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव म्हणाले.
मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील काम गेल्या तीन वर्षांपासून कागदावरच आहे. भूमिपूजनाच्या तीन वर्षांनंतरही दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात झालेली नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले आहे. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरही २९ नोव्हेंबर रोजी ‘मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा कागदावरच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून या प्रलंबित प्रश्नाकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर वार्षिक निरीक्षणानिमित्त दाखल झाल्यानंतर विनोदकुमार यादव यांनी प्राधान्याने रेल्वेस्टेशनच्या आगामी कालावधीत करण्यात येणाऱ्या विकासासंदर्भात माहिती दिली.
रेल्वेस्टेशनच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये नव्या इमारतीसमोर वेरूळ लेणीतील शिल्पांची उभारणी, अजिंठा-वेरूळ लेण्यांना नजरेसमोर ठेवून प्रवेशद्वाराची उभारणी केली जाणार आहे. जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून सध्याच्या नव्या इमारतीप्रमाणे स्वरूप दिले जाणार आहे. याबरोबर पार्किंग सुविधा, रेस्टरूम, बुकिंग कक्ष, प्रवासी चौकशी कक्ष आदी कामे वर्षभरात होतील, असे यादव यांनी सांगितले.
डेक्कन ओडिसीने प्लॅटफॉर्मचा विकासआजघडीला पर्यटनाची शाही रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक-४ वर दाखल होते. या ठिकाणी काहीही सुविधा नाहीत. ही बाब लक्षात घेऊन देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून या प्लॅटफॉर्मचाविकास केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम केले जाईल, असे विनोदकुमार यादव म्हणाले.