करमाड : गतवर्षी लॉकडाऊन काळात सटाणा शिवारात ८ मे २०२० रोजी रेल्वे रूळावर मध्यप्रदेशातील १६ कामगारांचा रेल्वेखाली चिरडून अंत झाला होता. या घटनेला शनिवारी एक वर्ष झाले. यानिमित्त पोलिसांनी या अपघातातील मृत कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली.
लाॅकडाऊन काळात काम बंद असल्याने जालना येथील लोखंडी सळया बनवणाऱ्या कंपनीत मध्य प्रदेशातील १९ कामगार अडकले होते. त्यांना परिवाराला भेटण्याची आस लागली होती. भुसावळ येथून रेल्वे मिळणार याची माहिती मिळाल्याने ७ मे २०२० रोजी रात्री हे कामगार जालना येथून भुसावळला जाण्यासाठी औरंगाबादमार्गे पायी निघाले होते. पहाटे ४ च्या सुमारास सटाणा शिवारात आल्यानंतर त्यांनी रेल्वे रूळावर विश्रांती घेतली. जालन्याहून औरंगाबादकडे येणाऱ्या मालगाडीखाली पहाटे ५.१५ च्या सुमारास १६ तरुण कामगार चिरडले गेले. यातील १४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर २ कामगारांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. रेल्वे रुळापासून अंतरावर झोपलेल्या ३ तरुणांचे प्राण वाचले होते.
या अपघाताने महाराष्ट्रसह संपूर्ण देश हादरून गेला होता. या अपघातानंतर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले होते. या भीषण घटनेला एक वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी करमाड पोलिसांच्या वतीने घटनास्थळी मजुरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, परिविक्षाधीन पोउप अधीक्षक पूजा गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.