जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोस असे एकूण पाच लाख तीन हजार ६८३ डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १४ हजार ४०८ जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील दहा हजार ५५१ जणांनी तर शहरात तीन हजार ८५७ जणांनी लस घेतली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी लस उपलब्ध नसल्याचा फलक लावण्यात आला होता. हीच स्थिती अनेक केंद्रांवर पहायला मिळत आहे. गेल्या १५ दिवसांपासून शहराला लसीच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, लसीकरणाचे नियोजन करताना आरोग्य यंत्रणेची कसरत होत आहे. कधी फक्त पहिला डोस दिला जातोय, तर कधी फक्त दुसरा डोस देण्यात येत आहे. या सगळ्यात लस मिळत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. लसीसाठी सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. दोन ते तीन दिवसाला जिल्ह्याला लसींचा पुरवठा होत आहे. परंतु या लसी लगेच संपूनही जातात. लस आली तर लसीकरण, अशी अवस्था शहराची झाली आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु त्यासाठी सहजासहजी स्लाॅट मिळत नाही. काही मिनिटांत स्लाॅट संपूनही जातात. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
औरंगाबादला मिळाले १९ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:04 AM