औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांचा शनिवारी राज्याभिषेक दिवस होता. यानिमित्ताने भाजपतर्फे शहरात ठिकठिकाणी ''नमस्ते संभाजीनगर'' या नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने टीव्ही सेंटर चौकासह सर्व ठिकाणी भाजपने लावलेले फलक काढून घेतले. फलक काढू नयेत म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिकार केला. मात्र मनपाने त्यांचे ऐकून घेतले नाही. या कारवाईच्या निषेधार्थ दुपारी टीव्ही सेंटर चौकातच भाजपकडून जोरदार निदर्शने करण्यात आली.
महापालिका निवडणूका होतील तेव्हा होतील. पण सध्या शहरात राजकीय पक्षांनी निवडणुकीचा बिगुल वाजविण्यास सुरुवात केली आहे. भाजपने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करा, ही मागणी उचलून धरली आहे. विशेष म्हणजे ५ वर्षे सत्तेत राहिलेल्या आणि पूर्ण बहुमताचे सरकार असूनही आपल्या राजवटीत भाजपला नामांतराचा विसर पडला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेला खिंडित गाठण्यासाठी भाजपने संभाजीनगरचा मुद्दा ताणून धरला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे शनिवारी औरंगाबाद दौर्यावर येणार असल्याने ही संधी साधून भाजयुमो तर्फे शुक्रवारी रात्री टीव्ही सेंटर चौकात सुपर संभाजीनगर बोर्डासमोरच नमस्ते संभाजीनगरचा बोर्ड लावला होता. तो पालिका प्रशासनाने सकाळीच कारवाई करीत हटविला. त्यामुळे भाजपचे नेते, कार्यकर्ते चांगलेच संतापले.
दुपारी एक वाजता टीव्ही सेंटर चौकातच भाजपने बॅनर काढल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी भाजपच्या आंदोलनाला परवानगी नाकारली तरीही भाजपचे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे टीव्ही सेंटर चौकात तणाव निर्माण झाला. टीव्ही सेंटर चौकात पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ निदर्शने केली. खासदार डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक राजू शिंदे, प्रमोद राठोड, जगदिश सिद्ध, रामेश्वर भादवे, अनिल मकरिये, राजगौरव वानखेडे, अॅड. माधुरी अदवंत, सविता कुलकर्णी, मनिषा भन्साळी आदी उपस्थित होते.