औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेबरोबर रेल्वेस्टेशनवरील नामफलकाचीही सुरक्षा करण्याची वेळ सध्या लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बलावर ओढावली आहे. कारण शहराच्या नामकरणावरून गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण तापले आहे. यातूनच रेल्वेस्टेशनवरील औरंगाबाद नामफलकाला चक्क संरक्षण देण्यात येत आहे.
नामकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशनवर खबरदारी घेतली जात आहे. या फलकाला प्रत्येक पाळीत ३ ते ४ जवानांकडून पहारा देत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा यांनी दिली. यापूर्वी रेल्वेस्टेशनवरील नामफलकावरील नाव बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामकरणाच्या मुद्याला तोंड फुटले आहे. शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेसने औरंगाबादचे नामाकरण करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यातच मनसेने शहरात औरंगाबादच्या नामाकरणाबद्दल ठिकठिकाणी पोस्टर्स लावली होती. या सगळ्यात रेल्वेस्टेशनवर खबरदारी घेतली जात आहे. औरंगाबाद नामफलकाला सुरक्षा देण्यात आली आहे.
रिकामे फलाट तरीही...रेल्वेस्टेशनवरून सध्या मोजक्याच रेल्व धावत आहे. रेल्वेचे फलाट रिकामे असल्यावर सुरक्षेचा फारसा मुद्दा येत नाही. पण रिकाम्या फलाटाच्या शेवटच्या टोकावर सध्या नामफलकाजवळ लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना उभे रहावे लागत आहे.