औरंगाबाद : खून, खुनाचा प्रयत्न, मंगळसूत्र चोरी आणि धारदार वस्तूने मारहाण करून लुटमारीच्या घटनांनी नव्या वर्षातील दीड महिन्यातच शतक पार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चाकू, सुऱ्यासह तलवारीसारखे घातक शस्त्र सोबत घेऊन फिरताहेत. किरकोळ कारणावरून थेट शस्त्राने हल्ला करण्याचे गुन्हे वाढले आहेत.
शिवजयंती मिरवणुकीत पुंडलिकनगरात श्रीकांत गोपीचंद शिंदे या २१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेच्या तीन दिवस आधीच आरोपींनी भारतनगरात एका तरुणाला घराबाहेर बोलावून प्राणघातक हल्ला केला होता. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गुलमंडीतील नगारखाना गल्लीतील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात घुसून व्यवस्थापकाचा निर्घृण खून करून आरोपी पसार झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. शहरातील गुंड उघडपणे तलवार घेऊन फिरण्याएवढे निर्भय झाले आहेत. यातूनच फ्लिपकार्टसारख्या आॅनलाईन बाजारातून शहरातील ४० हून अधिक तरुणांनी तलवारी मागविल्या होत्या. पोलिसांना न जुमानता शिवजयंती मिरवणुकीत अनेक तरुण तलवारीसह सहभागी झाले होते. तलवारीसह छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सशस्त्र हाणामारीच्या घटना शहरात सतत घडत आहेत. गुंडांना ट्रॅप करण्यासाठी पोलिसांकडून अचानक राबविले जाणारे ‘आॅपरेशन आॅल आऊट’ सारख्या मोहिमा कमी झाल्याने गुन्हेगारी फोफावते आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शस्त्राने हल्ला केल्याच्या तब्बल १०९ घटनाशस्त्राने मारहाण करून दुखापत करण्याच्या तब्बल १०९ घटनांची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे, तर दुचाकीस्वार चोरट्यांनी विविध ७ ठिकाणांहून पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचे समोर आले. या घटना समर्थनगर, उल्कानगरी, ज्योतीनगर, जवाहरनगर, छावणी आणि सातारा परिसरात घडल्या. लुटमार आणि जबरी चोरीच्या तब्बल एक डझन घटनांची नोंद शहरात झाली.
गतवर्षीच्या तुलनेत रस्त्यावरील वाटमारी, जबरी चोरी,मंगळसूत्र चोरीच्या घटना कमी झाल्या. मारहाण करून साधी व गंभीर दुखापत करण्याच्या घटना घडल्या आहेत. तलवारी घेऊन फिरणाऱ्यांची माहिती मिळताच पोलिसांकडून लगेच त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाते. - निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त