औरंगाबाद : ‘एमपीएससी’तील सर्व पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करा, ‘ रिक्त जागा भरा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी आज सकाळी रस्त्यावर उतरले. क्रांती चौकातून निघालेला त्यांचा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
जय भगवान महासंघ महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीतर्फे सकाळी ११ वाजता क्रांतीचौकातून विभागीय आयुक्तालायावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘तलाठी पदाची ३०८४ रिक्त पदे भरावी’, ‘जिल्हा परिषदेची एकही शाळा बंद करू नये’, ‘परीक्षेत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी’, ‘३० टक्के नोकर भरती कपातीचे धोरण रद्द करावे, अशा विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले. मोर्चात विद्यार्थ्यांसह विद्यार्थींनीनीसुद्धा उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
याप्रसंगी जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, जय भगवान महासंघ विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राज आव्हाड, सचिन डोईफोडे, बाबा मिसाळ, विशाल सानप, योगेश जाधव आदींची उपस्थिती होती. मोर्चाच्या शेवटी विभागीय आयुक्तालयासमोरील मैदानावर विद्यार्थी एकत्र जमले. यावेळीही विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. समितीतर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.