औरंगाबाद : औरंगाबादची प्रतिभावान जिम्नॅस्ट आणि अनेक राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेती कामगिरी करणारी सिद्धी हत्तेकर हिची भारतीय ज्युनिअर जिम्नॅस्टिक संघात निवड झाली आहे. सिद्धी हत्तेकर ही जकार्ता येथे २५ ते २८ एप्रिलदरम्यान रंगणाऱ्या ज्युनिअर आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याच वर्षी होणाºया युवा आॅलिम्पिकच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेतूनच युवा आॅलिम्पिकसाठी पात्रता ठरणार आहे. या स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील साई केंद्राचे प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.सिद्धीची निवड ही २७ मार्च रोजी सूरत येथे झालेल्या निवड चाचणीतून झाली आहे. शारदा मंदिर कन्या प्रशालेत इयत्ता ८ वीत शिकणाºया सिद्धी हत्तेकर हिला तनुजा गाढवे आणि रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, अजितसिंग राठोड, पिंकी देव, एमएसएमचे अध्यक्ष रामभाऊ पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, राज्य संघटनेचे सचिव मकरंद जोशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, स. भु. संस्थेचे सरचिटणीस दिनेश वकील, सहसचिव किरण देशपांडे, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा रश्मी बोरकर, शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा देव-कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका उज्ज्वला निकाळजे, विशाल देशपांडे आदींनी सिद्धीचे अभिनंदन करीत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
औरंगाबादची सिद्धी भारतीय जिम्नॅस्टिक संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:28 AM