Bus catches Fire, Video: औरंगाबाद-जालना महामार्गावर वरुड काजी फाट्याजवळ बस पेटल्याची घटना नुकतीच घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. यावेळी चालक नारायण बैनाजी थोटे यांच्यासह वाहक अमोल विनायक नवल यांच्यासह आठ प्रवासी मनपाच्या सिटी बस ( MH 20 EL 1363 ) या गाडीत होते. ही घटना साधारण साडेबारा वाजेच्या नंतर घडली.
समोरील डाव्या बाजूच्या टायरमध्ये आवाज येत होता. त्यामुळे चालकाने बस डाव्या बाजूला उभी केली आणि कसला आवाज येतो हे बघण्यासाठी खाली उतरले. त्यांना इंजिनच्या खालून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतील सर्वच्या सर्व प्रवाशांना मागच्या दरवाजाने खाली उतरवले. बसमध्ये असलेल्या दोन अग्निशामक पंपच्या साह्याने चालकाने व वाहकाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने शेंद्रा MIDC तील अग्निशामक दलाचे बंब बोलविण्यात आले.
या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली. चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने या घटनेचा तपास सुरू आहे. गाडीमध्ये असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी, असा चालकाचा प्राथमिक अंदाज आहे.