औरंगाबाद : राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांमध्ये अधिसभेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वगळता राज्यातील एकाही विद्यापीठात प्राध्यापक आणि विद्यापरिषदेला नामांकन दाखल करताना प्राचार्य, संस्थाचालकांच्या सही, शिक्क्यांची गरज नाही. मात्र विद्यापीठात नामांकन दाखल करताना प्राचार्य, संस्थाचलाकंची सही घेण्याचे बंधनकारक केले. यात अनेक प्राध्यापकांना प्राचार्यांनी सह्या दिलेल्या नाहीत. यामुळे ही निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी बामुक्टोतर्फे केली आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणूकीत प्राध्यापक आणि विद्यापरिषद गटात नामांकन दाखल करण्यासाठी २ एफ १२ बी, कायमस्वरुपी संलग्नताचे प्रमाणपत्र, प्राचार्यांची अर्जावर सही शिक्का असणे बंधनकारक केले आहे. मात्र राज्यातील एकाही विद्यापीठाने अशा कागदपत्रांची मागणी केलेली नाही. याची तरतुदच विद्यापीठ कायद्यात नाही. जो प्राध्यापक मतदार म्हणून पात्र ठरला आहे. त्याचवेळी त्याने ही कागदपत्रे दिलेली असतात. त्यामुळे उमेदवारी अर्जावर प्राचार्याच्या सहीची आवश्यता नसते. मात्र विद्यापीठाने विद्यापीठ कायद्यात तरतुद नसताना अशा जाचक अटी नामांकन दाखल करण्यासाठी ठेवल्या आहेत. यामुळे अनेक संस्थाचलकांनी प्राचार्यांना दम देत इच्छूक उमेदवारांना नामांकन दाखल करण्यासाठी सह्या, शिक्के दिले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कायदा आणि लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही मतदाराला नामांकन दाखल करता येते. मात्र विद्यापीठाने याच गोष्टीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र अधिका-यांनी रचले असल्याचा आरोप ‘बामुक्टो’चे पदाधिकारी डॉ. विक्रम खिलारे यांनी केला आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सुधारीत अर्जासह सर्वांनाच नामांकन दाखल करण्यास मुभा द्यावी, अन्यथा ही निवडणूक प्रक्रियाच रद्द करावी,अशी मागणीही केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणताही निर्णय न घेतल्यास राज्यपाल कार्यालयाकडे तक्रार करण्यात येणार असल्याही डॉ. खिलारे म्हणाले. याविषयी बामुक्टोतर्फे कुलगुरूंना बुधवारी निवेदन देण्यात येणार आहे.