औरंगाबाद: शिवसेनेसोबत युती असलेले आणि स्वत:ला महाविकास आघाडीचा घटक पक्ष माननाऱ्या संभाजी ब्रिगेडलाऔरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ आणि अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून निवडणुक लढवायची आहे. शिवसेनेच्या कोट्यातून या दोन्ही जागा मिळाव्यात,यासाठी शिवसेनेसोबत बोलणे सुरू असल्याचे संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. भानुसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि आर.एस.एस.ला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या विचारधारेवर आमची शिवसेनेसोबत युती झालेली आहे. शिवसेना ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने पर्यायानेही आम्हीही महाविकास आघाडीचाच भाग असल्याचे मानतो. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची आणि अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढविण्याची संभाजी ब्रिगेडची तयारी आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाला विधान परिषदेच्या निवडणूकांच्या ज्या जागा येतील, त्यातील दोन जागेची आम्ही मागणी करीत आहोत.
यासंदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी शिवसेनेसोबत दोन दिवसांत बैठक होईल. या बैठकीत महाविकास आघाडीच्या हिताचा असा जो निर्णय शिवसेना घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.या पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ॲड. वैशाली कडू पाटील, रेखा वाहटुळे आणि रविंद्र वाहटुळे यांची उपस्थिती होती.