लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वे प्रशासनाकडून ‘दमरे’च्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला गती देण्यात येत आहे. ८०५.६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या मनमाड ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली. सेंट्रल आॅर्गनाझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनच्या संकेतस्थळावर ही निविदा प्रसिद्ध झाली असून, मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी २० डिसेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनची पाहणी केली. यावेळी नांदेड विभागातील रेल्वेमार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार असून, विद्युतीकरणाच्या कामाने इंजिन नादुरुस्तीच्या घटनांना कायमस्वरूपी आळा बसेल, असे ते म्हणाले. यानंतर विद्युतीकरणाच्या कामासाठी १२ जानेवारीपासून नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. यात रेल्वे पूल, लेव्हल क्रॉसिंग (भुयारी मार्ग), वळण, सिग्नल, पॉइंट अॅण्ड क्रॉसिंग आदींविषयी माहिती गोळा करण्यात आली. सेंट्रल आॅर्गनाझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनच्या अलाहाबाद मुख्य कार्यालयातर्फे मनमाड, अंकई ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रिक्वेस्ट फॉर क्लॉलिफिकेशन (आर.एफ.क्यू) डाक्युमेंट्सची १७ जानेवारीपासून विक्री सुरू आहे.५ मार्चपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी हे प्रस्ताव जमा करण्याची तारीख आहे. याच दिवशी हे प्रस्ताव उघडले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात अधिकृत माहिती प्राप्त होणे बाकी असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी म्हणाले.
औरंगाबाद : रेल्वेमार्ग विद्युतीकरणाची निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:50 PM