औरंगाबाद : देशभरातील नामांकित बँक, टेलिफोन ऑपरेटर कंपन्यांसाठी वसुलीचे कंत्राट घेऊन चालवण्यात येणाऱ्या पैठण गेट येथील काॅल सेंटरवर बुधवारी कारवाई करण्यात आली. डेहराडून (उत्तराखंड) पोलिसांच्या संपर्कात असलेला या काॅल सेंटरचा मालक जोहेब कुरेशी ऐनवेळी मोबाइल बंद करून पसार झाल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. डेहराडून पोलिसांना पुरावे मिळाल्याने शहर पोलिसांनीही काॅल सेंटरमधून ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालत होते का, या दृष्टीने तपासाला सुरुवात केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
डेहराडूनच्या तक्रारदारांना धमकावणे, ब्लॅकमेल करणाऱ्या ३४ क्रमांकापैकी २४ क्रमांकाचे सीमकार्ड झोएबच्या कॉल सेंटरमध्ये डेहराडून पोलिसांना आढळून आले. बुधवारी सकाळी पैठण गेट परिसरातील यश एंटरप्रायजेस येथे डेहराडून पोलिसांच्या पथकाने छापा मारला. तिथे नामांकित कंपन्यांच्या वसुलीचे चार वेगवेगळे कॉल सेंटर असून ३ शिफ्टमध्ये ३०० हून अधिक तरुण काम करत असल्याचे दिसल्याने स्थानिक पोलिसांनाही धक्का बसला. मात्र, छाप्यापूर्वीच झोएब कुरेशी पसार झाला. पोलिसांनी ३३ पैकी २३ सीमकार्ड, ५ मोबाइल, २ डायलर जप्त केले. त्यामुळे जोहेब कुरेशीच्या अडचणीत वाढ झाली आहे. या कारवाईच्या वेळी शहर पोलिसांनीही संशयास्पद १३५ साधे मोबाइल, १० स्मार्ट फोन आणि ४ लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक साहित्य हस्तगत केले. सायबर पाेलिसांनी नेमका काॅल सेंटरमध्ये काय प्रकार सुरू होता, याचा तपास सुरू केला. त्या आधारे मुख्य स्त्रोतांसह, काम देणाऱ्या बँकांकडूनही माहिती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून काॅल सेंटर...कर्ज देणाऱ्या ॲपसाठी कर्ज घेणाऱ्यांसाठी कॉल सेंटर गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू होते. छाप्यापूर्वी झोएब पसार झाल्याने शहरातील व्यापारी, राजकारणी, पोलिसांत जोहेबची ऊठबस असल्याची चर्चा पैठण गेट परिसरात आहे.