‘डीएमआयसी’ने कात टाकली
तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग डिसेंबर, २००६ मध्ये जपान दौऱ्यावर गेले असता, जपान आणि भारत सरकारमध्ये औद्योगिक गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. केंद्र सरकारने त्याचे नाव ‘दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर’ असे दिले. त्यानंतर, सन २०१४ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने औरंगाबादेत ‘डीएमआयसी’साठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर, ऑरिकच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ७ सप्टेंबर, २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तेव्हापासून शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात (ऑरिक सिटी) उद्योग आकर्षित व्हायला लागले. परवा नीति आयोगाचे ‘सीईओ’ अमिताभ कांत हे औरंगाबादेत येऊन गेले. त्यांनी ऑरिक सिटीला भेट दिली. त्यांनी तेथील पायाभूत सुविधांची पाहणी करून परिसरातील उद्योगांचा आढावा घेतला. शेंद्रा परिसरातील ऑरिक सिटीची इमारत ही एक अतिउच्च दर्जाचे नियोजन असून, यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सेवा, ‘कमांड सेंटर’द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिउत्कृष्ट पद्धतीने वापर करण्यात आला आहे. ऑरिक सिटी औद्योगिक नागरी वसाहत, अतिथी सेवा, पर्यटन, व्यापार या क्षेत्रातील विकासासाठी साहाय्यभूत ठरणारे एकात्मिक सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणून आगामी काळात गणले जाईल, या शब्दांत त्यांनी ऑरिक सिटीचे कौतुक केले.
दिल्लीजवळील गुडगाव परिसरात औद्योगिक विकासाला ३० वर्षे, तर ग्रेटर नोएडा येथे ४० वर्षांचा कालावधी लागला होता. याच्या तुलनेने शेंद्रा- बिडकीन इंडस्ट्रीयल बेल्टमध्ये उद्योग येण्या अगोदरच उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या असल्यामुळे येणाऱ्या पाच वर्षांत ‘डीएमआयसी’चा चेहरामोहरा बदलेल, असे भाकीत अमिताभ कांत यांनी केले. कोविड महामारीचा संसर्ग कमी झाल्यानंतर या ठिकाणी मोठे उद्योग तर येतीलच, परंतु सोबत ते व्हेंडर्सही घेऊन येतील. लवकरच बिडकीन औद्योगिक बेल्ट लिंक करण्यात येणार असून, शेंद्रा-बिडकीन हे लवकरच देशातील सर्वोत्कृष्ट नवीन शहर म्हणून उदयास येईल, यात शंकाच नाही.
‘डीएमआयसी’ला राष्ट्रीय महामार्गाची जोडणी
शेंद्रा व बिडकीन इंडस्ट्रीयल बेल्टला राष्ट्रीय महामार्गाची कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. ‘डीएमआयसी’ला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्ही देण्यासाठी ‘एमआयडीसी’ने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे ४३ कोटी रुपयांचा निधी सुपुर्द केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल. ‘डीएमआयसी’मधील उत्पादन आणि कच्च्या मालाची ने-आण करण्यासाठी औरंगाबाद-पुणे, औरंगाबाद- मुंबई, औरंगाबाद- सोलापूर असे महामार्ग अस्तित्वात येत आहेत. शेंद्रा-बिडकीन लिंक रोडसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणासोबत बोलणी सुरू आहे. या औद्योगिक पट्ट्यांमध्ये रस्ते ९० मीटर रुंदीचे असतील. या पार्कला जोडून लवकरच जालना येथे ड्रायपोर्टही उभारले जाणार आहे. एकूणच औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे.
औरंगाबादेतील विमानतळाच्या विस्तारीकरणाला चालना देऊन लवकरच येथे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी नीति आयोगाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक व गुंतवणूकदारांना थेट औरंगाबादेत येणे शक्य होणार आहे. याशिवाय, येथे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचे प्रयत्न होत असून, यासाठी येथील उद्योग संघटना प्रयत्नशील आहेत.
बिडकीन औद्योगिक पट्ट्यात फूडपार्क
बिडकीन औद्योगिक पट्ट्यात ‘फूडपार्क’ उभारण्यासाठी ‘औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाउनशिप लिमिटेड’च्या (एआयटीएल) संचालक मंडळाने सहा-सात महिन्यांपूर्वीच मान्यता दिली असून, अन्नप्रकिया उद्योगांशी संबंधित देश-विदेशातील उद्योगांना निमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच ‘डीएमआयसी’तील गुंतवणुकीबाबत मार्केटिंगची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली सुरू होतील.