औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर प्रस्तावित पीटलाइन १६ऐवजी २४ बोगींची करण्यासाठी मालधक्का स्थलांतरास अखेर दक्षिण मध्य रेल्वेची यंत्रणा कामाला लागली आहे. मालधक्का येथे गुरुवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यापारी, मालवाहतूकदार प्रतिनिधींशी चर्चा केली. मालधक्का इतरत्र हलविल्यास काय परिणाम होतील, याबाबत चर्चा करण्यात आली. मालधक्क्यासाठी दौलताबाद, करमाड, पोटुळ आणि लासूर येथील पर्याय ठेवण्यात आले. यात दौलताबादलाच बहुतांश जणांनी होकार दिला.
औरंगाबादेत १६ बोगींची पीटलाइन मंजूर झाली, मात्र ऐन पीटलाइनच्या पायाभरणीच्या समारंभात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २४ बोगींच्या पीटलाइनसाठी स्टेशनवरील मालधक्का स्थलांतरित करावा की ठेवावा, यासंदर्भात उद्योग, व्यापाऱ्यांशी चर्चा करून १० दिवसांत प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीआरएम) केली. त्यानंतर अखेर गुरुवारी ‘दमरे’च्या नांदेडचे विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक नागेंद्र प्रसाद; तसेच विभागीय वाहतूक व्यवस्थापक जय पाटील यांनी रेल्वे मालधक्क्यांशी संबंधित संघटना सदस्य, वाहतूकदार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून मालधक्का स्थलांतरास सर्वांनी सहमती दर्शविली. दौलताबादेत मालधक्का स्थलांतरित केल्यास, व्यापाऱ्यांवर किंवा उद्योजकांनाही त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
स्टेशन येथील रेल्वे मालधक्का हलविण्याबाबतच्या मागणीबाबात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे स्थानकप्रमुख एल. के. जाखडे यांच्याशी लोकप्रतिनिधीसमोरच चर्चा केली. त्यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण जैन यांचीही उपस्थिती होती. यावेळी रेल्वे मालधक्का स्थलांतराचा मुद्दा उपस्थित झाला होता.
या प्रश्नांकडे वेधले लक्षमालधक्का इतरत्र स्थलांतरित केल्यास इंधनाचा खर्च वाढेल. शिवाय ये-जा करण्यासाठी अधिक वेळही जाईल. मालधक्का येथे मालाची चढ-उतार करणारे बहुतांश हमाल हे स्टेशन परिसरातच राहतात. मालधक्का स्थलांतरित झाला, तर त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न उद्भवू शकतो. यासह विविध मुद्दे मालवाहतूकदार आणि प्रतिनिधींनी मांडले.