औरंगाबाद : शेंद्रा येथील ऑरिक सिटीमध्ये ५ ते ८ जानेवारीदरम्यान होत असलेल्या मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरल असोसिएशनच्या (मसिआ) महाॲडव्हांटेज औद्योगिक एक्स्पोच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा दौरा रद्द झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस औरंगाबाद येथे मसिआच्या वतीने आयोजित अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोच्या उदघाटनासाठी येणार होते. परंतु, मुंबई विमानतळावर विमानात अचानक बिघाड झाल्याने त्यांचा दौरा रद्द झाला. दुसऱ्या विमानाने येण्यास उशीर होणार असल्यामुळे औरंगाबादचा कार्यक्रम रद्द केला, तसेच आज सांयकाळी पुण्यात कार्यक्रम असल्याने आठ तारखेला समारोपाच्या सत्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येतील, अशी माहिती आहे.
३० एकरांवर होत असलेल्या या प्रदर्शनात ६५० स्टॉल्स आणि ११ चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखविली जाईल. मराठवाड्यातील उद्योग वाढीसाठी हे प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गुंतवणूकदार, उद्योजकांनी सकाळी १० ते २ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, तर विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी दुपारी २ वाजेनंतर वेळ देण्यात आला आहे. मागील काळात डीएमआयसीला भेट देऊन गेलेल्या, परंतु येथे गुंतवणूक न केलेल्या १३५ उद्योगांच्या प्रतिनिधींना प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
नामांकित कंपन्यांसोबत बैठकांचे आयोजनरेल्वे विभाग, सिमेन्स, इंड्युरन्स, एंड्रस हाऊजर यासारख्या नामांकित कंपन्या लघु उद्योजकांना काम देण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी खास बिझनेस टू बिझनेस मिटिंग आयोजित करण्यात आल्या आहेत. यासोबत रॉयल एनफिल्ड, भारत फोर्ज, जेसीबी, आनंद ग्रुप, बजाज ऑटो , इंड्युरन्स, व्हेरॉक, संजीव ऑटो आदी कंपन्यांचे वरिष्ठ पर्चेस आणि मटेरियल अधिकारी प्रदर्शनाला भेटी देतील.
स्मार्ट सिटीच्या बसची व्यवस्थाऑरिक सिटीला प्रमोट करण्यासाठी प्रदर्शन प्रथमच शहराबाहेर ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेटी देणाऱ्यांसाठी वाळूज येथील मसिआ ऑफिसपासून आणि शहरातून स्मार्ट सिटीच्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा झाल्याचे संयोजकांनी सांगितले.