औरंगाबाद : पर्यटकांअभावी मागील ९ महिन्यांपासून बंदिस्त असलेल्या ऐतिहासिक स्मारकांची, पर्यटनस्थळांची द्वारे गुरुवारी सकाळीच उघडण्यात आली आणि पुन्हा एकदा शहर आणि परिसरातले ऐतिहासिक सौंदर्य पर्यटकांना भेटण्यासाठी खुलून आले.
अनलॉकदरम्यान इतर पर्यटन स्थळे सुरू झाली असली तरी औरंगाबादचे पर्यटन मात्र बंदच होते. गुरुवारी औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळे खुली झाली आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना, उद्योजकांना दिलासा मिळाला. पर्यटन स्थळांच्या तिकीट खिडक्यांवर दिसलेली रांग पर्यटन जगताला नवी संजीवनी देणारी ठरली. बीबी का मकबरा परिसरात पहिले आलेल्या पर्यटकांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले. आपण आज या ऐतिहासिक क्षणाचे पहिलेवहिले साक्षीदार ठरलो आहोत, याचा आनंदही पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसून आला. क्यूआर कोड स्कॅनिंग करून ऑनलाइन माध्यमातून तिकिटे काढूनच पर्यटकांना प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक पर्यटकाची अतिशय शिस्तबद्ध तपासणी आणि सॅनिटायझेशन केल्याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षारक्षक सज्ज होते. नेहमीच्या तुलनेत पर्यटनस्थळी खूपच कमी फेरीवाले दिसून आले. त्यांच्या वस्तूंची पहिल्या दिवशी विशेष विक्री झाली नाही; परंतु लवकरच आता आपलाही व्यवसाय सुरू होईल, अशी आशा मात्र त्यांना नक्कीच होती.
क्यूआर कोड स्कॅन करताना अडचणीवेरूळ लेणी परिसरात सकाळच्या सत्रात जवळपास ३०० पर्यटकांची उपस्थिती होती. दिवसभरातून अंदाजे ५०० पर्यटक याठिकाणी येऊन गेले. पहिल्या दिवशी अंदाजे २५० जणांनी बीबी का मकबरा पाहिला, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी आलेले बहुतांश पर्यटक हे औरंगाबाद शहर आणि आसपासच्या गावांतून आले होते.सवयीचे नसल्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन तिकीट काढणे अनेकांना त्रासदायक झाले होते. स्कॅनिंग कसे करायचे, ऑनलाइन पेमेंट कसे करायचे, याबाबत अनेक पर्यटक संभ्रमावस्थेत दिसून आले. क्यूआर कोड आणि स्कॅनिंग पहिल्यांदाच होत असल्याने पर्यटनस्थळी असलेली तांत्रिक टीमही पर्यटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सज्ज होती.