औरंगाबाद : शहरात मागील १५ महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. अग्निशमन विभागाला दररोज दोन ते तीन ठिकाणी कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी जावे लागते. मागील दहा महिन्यांत अग्निशमन विभागाने तब्बल ७८४ ठिकाणी आग विझविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
१६ फेब्रुवारीपासून २०१८ पासून नारेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कचरा डेपोसमोर आंदोलन केले. महापालिकेची वाहने अडवून धरली. नंतर त्यांनी नारेगाव येथे कचरा टाकणे बंद करेपर्यंत माघार घेतली नाही. ग्रामस्थांची ही लढाई न्यायालयापर्यंत गेली. शेवटी न्यायालयानेही पालिकेला नारेगाव येथे कचरा टाकण्यास बंदी घातली. त्यामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यानंतर शहरात कचऱ्याचे हजारो डोंगर तयार झाले होते. या कचऱ्याला मनपा कर्मचारीच आग लावत होते. पोलीस बंदोबस्तात मिटमिटा भागात कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांनी दंगल घडवून आणली. या घटनेत अग्निशमन विभागाचे नवीन वाहन जळून खाक झाले. येथील जाळपोळीची घटना घडल्यानंतर राज्यभरात औरंगाबादचा कचरा प्रश्न पोहोचला.
विधानसभेतही याचे पडसाद उमटल्यानंतर विभागीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. समितीने हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव व कांचनवाडी या चार ठिकाणी कचरा टाकण्यास मनपाला मुभा दिली. तसेच या ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचेही बजावले. मात्र, वर्ष उलटले तरी पालिकेने अद्याप प्रक्रिया केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शहरातील कचराकोंडी आजही कायम आहे. शहरात जागोजागी कचरा साचत असल्याने नागरिकांकडून त्यास आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. मध्यंतरी तर कचरा कमी करण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारीच कचऱ्याच्या ढिगारांना आग लावत असत्याचे समोर आले होते. मागील दहा महिन्यांत अशाप्रकारे शहरात ७८४ ठिकाणी कचऱ्याला आग लावण्यात आल्याचे अग्निशमन विभागाने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे.