औरंगाबाद : बीड बायपासवर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास देवळाई चौकात हायवा ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (३२,रा.कटकट गेट ) असे मृताचे नाव असून तो बायपासवरून बदनापूरच्या दिशेने निघाला होता. या मार्गावर मागील आठ महिन्यातील हा ८ वा बळी गेला आहे.
अब्दुल अजीमचे संग्राम नगर उड्डाणपुलाजवळ एका पेट्रोल पंपावर गॅरेज होते. आज सकाळी तो गॅरेजच्या कामासाठीच बदनापूरकडे निघाला होता. देवळाई चौकात छत्रपती नगरजवळ पाठीमागून आलेल्या एका हायावा ट्रकने त्याच्या गाडीला धडक दिली. यामुळे तो गाडीसह रत्यावर कोसळला आणि गंभीर जखमी झाला. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर पोलिसांनी हायावा ट्रक पोलीस स्थानकात उभी केली असून चालकाची चौकशी सुरु आहे. सततच्या अपघाताने बायपास मृत्यूचा सापळा बनला आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार संजय सिरसाट आणि हर्षवर्धन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मनपाचे पथकसुद्धा येथे दाखल झाले आहे.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली असून बायपासवर वाहतूक शिस्तीसाठी कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
बायपास रोड मृत्यूचा सापळाबायपास मृत्यूचा सापळा ठरला असून, आठ महिन्यांत या मार्गावर बळींची संख्या संख्या १० वर पोहोचली आहे. शाळकरी मुलांसह पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिता आल्हाट ही गरोदर महिला, मिस्त्री, साताऱ्यातील युवक मॉर्निंग वॉकला जाताना त्याला बजाज दवाखान्यासमोर अज्ञात वाहनाने उडविले. एमआयटीसमोर एक चिप्स विक्रेता, पैठण रोडवर डॉ. सारिका तांदळे, देवडानगर येथे एका मोपेडवरील महिलेला ट्रकने चिरडले आदी घटनांत ९ जणांचा बळी गेला आहे. यानंतर आज हा दहावा बळी ठरला आहे. एवढ्या अपघाताच्या घटना घडत आहेत; परंतु सर्व्हिस रोडचा मुद्दा मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर ढकलून मोकळे होत आहेत.