औरंगाबाद: दोन दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात साचलेले पाणी पाहtन पोहायला गेलेल्या दोन तरुण मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झाल्टा गायरान शिवारात झाली. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनिल किसन मगरे (२६, वर्षे, रा. सुकनानगर झोपडपट्टी, सुंदरवाडी) आणि शेख शाहरुख शेख चांद (२०, रा. इंदिरानगर, गारखेडा) अशी दोघांची नावे आहेत. सुंदरवाडीतील सुकनानगर झोपडपट्टी येथील रहिवासी अनिल आणि शहारुख हे दोघे चांगले मित्र होते. मिळेल ते काम करून ते उपजीविका भागवत. लॉकडाउनपासून काम नसल्यामुळे ते सध्या बेरोजगार होते. शाहरुख दुपारी अनिल यास भेटायला गेला होता. यानंतर दोघे जण झाल्टा फाटा परिसरात फिरायला गेले. फिरत असताना गायरान मधील नाल्यात पावसाचे पाणी साचल्याचे त्यांना दिसले. हे पाणी पाहुन त्यांना पोहण्याचा मोह झाला. यानंतर दोघांनी आपआपले कपडे काढून नाल्याच्या काठावर ठेवले आणि पाण्यात उड्या घेतल्या. या नाल्यात खूप खड्डे होते. या खड्ड्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने पोहता पोहता ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी कोणीही जवळ नव्हते. यामुळे त्यांना मदत मिळू शकली नाही.
काही वेळाने परिसरातील तरुणाना नाल्याच्या काठावर दोन जणांचे कपडे आणि चप्पल बुट दिसले. शिवाय दोन तरुण नाल्याच्या दिशेने गेल्याचे त्यांनी पाहिले होते. ते तेथे दिसत नसल्याने त्याना संशय आल्याने त्यांनी या घटनेची चिकलठाणा पोलिसांना कळविली. सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार प्रदिप ठुबे , बिट अंमलदार लहू थोटे, थोरे, सचिन रत्नपारखे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तेथील लोकांचे मदतीने त्यांना बेशुद्धावस्थेत पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता. तेथील डॉक्टरांनी अनिल आणि शहारुख यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.