औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याचे वृत्त अफवाच ठरल्याचे आज स्पष्ट झाले. बीएचयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राकेश भटनागर यांची नियुक्ती झाली आहे. मात्र याचवेळी डॉ. चोपडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज केला असून, या पदासाठी १३ व १४ एप्रिल रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची वारणसी येथील प्रसिद्ध बीएचयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याचे वृत्त वाराणसी आणि दिल्लीतून प्रकाशित झाले होते. यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्टीकरण देत बीएचयूच्या कुलगुरूपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते. तरीही डॉ. चोपडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत होता. मात्र, बीएचयूच्या कुलगुरूपदाचा निवड आज जाहीर करण्यात आली. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील प्रोफेसर राकेश भटनागर यांची नियुक्ती झाली आहे.
बनारस विद्यापीठाची संधी हुकली असती तरी डॉ. चोपडे यांनी आणखी एक टर्म मिळविण्याच्या आशा सुटलेल्या नाहीत. मुंबई विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना निकालातील दिरंगाईमुळे पदावरून जावे लागले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. यामुळे समिती गठीत करुन पूर्णवेळ कुलगुरूपदासाठी निवड प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी पात्र प्राध्यापकांकडून अर्ज मागविण्यात आले. यात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीही अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या तीन सदस्यांच्या समितीने या पदासाठी देशभरातील ३४ जणांना मुलाखतपत्र पाठविले आहे. या सर्वांची मुलाखती १३ व १४ एप्रिल रोजी मुंबईत आयोजित केल्या आहेत.
विद्यापीठातील चार जण पात्रमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी समितीने एकुण ३४ जणांना पात्र ठरविल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात औरंगाबादच्या विद्यापीठातील चार जणांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, माजी बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे आणि प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे यांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज केला होता. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहिले नव्हते.