औरंगाबाद : पोलिसांवर दगडफेक करून संस्थान गणपती परिसरामध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी १३ मे रोजी अटक केलेल्या १४ जणांपैकी ८ जणांनी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
‘त्या’ आठ जणांना वैद्यकीय अहवालासह सोमवारी (दि.१४ मे) न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी त्या सर्वांचे ‘इनकॅमेरा’ जबाब नोंदविले. न्यायालयाने त्या आठ जणांच्या ‘पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी’ सुनावली.
१३ मे रोजी वरील गुन्ह्यात चौदा जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्यापैकी सात जणांनी पोलिसांनी लॉकअपमध्ये मारहाण केल्याची तक्रार केली होती, तर एकाने तो विधिसंघर्ष बालक असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्याची दखल घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देत न्यायालयात अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते.
त्यानुसार सय्यद हफीज सय्यद नईम, शेख शहाबाद शेख रफिक, सय्यद मतजीबेलीन सय्यद मोबीन, तरबेज खान इमानू खान, मोसीन खान ताहेर खान, शेख जुनेद शेख अय्युब, शेख फय्याज शेख अहमद या सात जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण असले तरी ते केव्हाचे आहेत हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवालात स्पष्ट केले नसल्यामुळे त्यांना नोटीस बजावावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी केला.
शेख अरबाज शेख रहीम हा विधिसंघर्ष बालक असल्याचे त्याने सांगितल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता तो २० वर्षांचा असल्याचे अहवालात म्हटले आहे. वयाच्या दाखल्यासाठी आधारकार्ड गृहित धरता येणार नाही. महापालिकेचा किंवा शाळेचा दाखला वयासाठी ग्राह्य धरला जाऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.