औरंगाबाद - औरंगाबाद हिंसाचारात सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर गंभीर जखमी झाले आहेत. कोळेकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र पुढील उपचारांसाठी कोळेकर यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे आज मुंबईमध्ये हलवण्यात येणार आहे. शुक्रवारी (11 मे) मध्यरात्री दोन गटांत झालेल्या किरकोळ वादामुळे तुफान हाणामारी झाली होती. तलवारी, चाकू, लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. यावेळी जमावानं पोलिसांची वाहने जाळली व त्याच्यावरही दगडफेकदेखील केली. यादरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या गळ्याला एक दगड लागला. कंठावर दगड लागल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली.
या दगडफेकीत कोळेकर यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाल्याची माहिती औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी दिली. कोळेकर यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनीदेखील सांगितले. दरम्यान, औरंगाबाद हिंसाचारप्रकरणी क्रांती चौक, जिन्सी, सिटी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Aurangabad Violence : कुठे चाललोय आपण?... 'हे' फोटो अस्वस्थ करतील! )
दहा पोलीस जखमीऔरंगाबाद हिंसाचादरम्यान पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यात सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलीस जखमी झाले आहेत. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य जखमी पोलिसांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.