औरंगाबाद - औरंगाबादमध्ये शुक्रवारी (11 मे) मध्यरात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळे तुफान हाणामारी झाली. या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दोन गटातील वादामुळे परिसरात जाळपोळ, तुफान दगडफेक करण्यात आली. जमावाने केलेल्या जाळपोळीत जगनलाल छगनलाल बन्सीले (वय 62 वर्ष, शहागंज) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शहागंज परिसरातील एका दुकानात जगनलाल शुक्रवारी (11 मे) झोपले होते. या हिंसाचारात शनिवारी (12 मे) पहाटे अज्ञातांनी त्या दुकानाला आग लावली.
दुकानाच्या चहुबाजूंनी आग पसरली, तेव्हा आगीच्या झळांमुळे जगनलाल यांना जाग आली. या आगीतून जीव वाचवण्यासाठी त्यांनी आटापिटा केला. मात्र ते दिव्यांग असल्याने त्यांना दुकानातून बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
(औरंगाबादमध्ये कशामुळे उडाला हिंसाचाराचा भडका?; 'हे' आहे खरं काळजीचं कारण)
एकाचा गोळीबारात मृत्यूदरम्यान, जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, जमावाकडून दगडफेक, जाळपोळ सुरूच होती. त्यामुळे अखेर पोलिसांनी हवेत गोळीबार करावा लागला. यामध्ये 17 वर्षीय एका मुलाचा मृत्यू झाला.
अनेक दुकाने, बँक, वाहने जाळली जमावाने परिसरातील अनेक दुकाने, वाहनांना आग लावली. यात एका शहागंज येथील कॅनरा बँकेच्या इमारतीचासुद्धा समावेश आहे.