औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शुक्रवारी (11 मे) मध्यरात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळे तुफान हाणामारी झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन गटातील वादामुळे परिसरात जाळपोळ, तुफान दगडफेक करण्यात आली. मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट आपापसात भिडले. तलवारी, चाकू , लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी वाहनांची, दुकांनाची तोडफोड-जाळपोळ केली. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला. यामध्ये एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, जमावानं केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलीस जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवाय, जालन्याहून अतिरिक्त कुमकदेखील मागवण्यात आली आहे. दगडफेकीत 25 जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे.
वादाचं नेमके कारण काय?
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम गुरूवारपासून सुरू केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुस-या एका धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरून मनपाच्या अधिका-यांनी दुस-या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन शुक्रवारी तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपापसात भिडले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. यात दुकानांबाहेर असणा-या कुलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरू केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले.
मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. गोळीबारही केला. रात्री उशिरा पोलिसांनी दंगलसदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र तणावपूर्ण परिस्थिती कायम होती.
सहायक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमीदोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले आहेत. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर पोलिसांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या तीन गाड्या जाळल्याया घटनेत पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तर इतर गाड्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. परिसरात असलेल्या इतरही गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली आहे.