औरंगाबाद : शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती. हप्ता न देणाऱ्याला पोलीस यंत्रणा क्षणार्धात हाकलून लावत असे. शहागंजमध्ये किमान २०० हातगाड्या उभ्या राहतात. दररोज दहा हजार रुपये आणि महिना तीन लाख रुपये हप्ता वसुलीतून मिळत होते. या आर्थिक गणितामुळे राजकीय मंडळींच्या पोटात गोळा उठला. त्यांनीही यात वाटा मागितला. हप्ता जमा करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत राजकीय व्यक्तीचे अलीकडेच खटके उडाले होते.
आजही असंख्य नागरिक खरेदीसाठी शहागंज भागात हमखास येतात. सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत या भागात पाय ठेवायलाही जागा नसते. प्रत्येक रस्त्यावर विविध विक्रेते दिसून येतात. मागील अनेक वर्षांपासून व्यावसायिक येथे फळ विक्री करून उदरनिर्वाह करीत आहेत. काही वर्षांपासून येथे हातगाडी लावण्यासाठी हप्ता वसुली सुरू झाली. सिटीचौक पोलिसांच्या आशीर्वादाने एक व्यापारी सर्व हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये जमा करू लागला. ही रक्कम सायंकाळी पोलिसांना देण्यात येत होती. दोनशे हातगाड्यांप्रमाणे दिवसभराचे दहा हजार रुपये जमा होतात. महिना तीन लाख तर वर्षाला ३६ लाख रुपये जमा होत होते. हप्ता जमा करणाऱ्या व्यक्तीला या भागातील एका राजकीय व्यक्तीने बोलावून घेतले. वाटणीच्या मुद्यावरून दोघांमध्ये चांगलेच खटके उडाले. याच राजकीय व्यक्तीने चमनमधील चप्पल विक्रेत्यांनाही महिना भाडे माझ्याकडे जमा करा, मनपाकडे एक रुपयाही जमा करू नका, असा सल्ला दिला होता. हा सल्लाही व्यापाऱ्यांनी धुडकावून लावला होता.
दंगलीत टार्गेट कोण ?हातगाडीचालकांकडून दररोज हप्ता वसुली करणाऱ्या व्यक्तीचे फळाचे दुकान सर्वात अगोदर जाळले. त्यानंतर चमनमधील चप्पल मार्केटला दंगलीत आग लावण्यात आली. आग कोणी लावली, त्यामागे हेतू काय होता. हा पोलीस तपासाचा भाग असला तरी क्षुल्लक वाटणारी ५० रुपयांची हप्ता वसुली कोणासाठी... किती वर्षांपासून सुरू होती याचाही तपास झाला पाहिजे. यातील दोषींवरही तेवढीच कारवाई झाली पाहिजे. हप्ता वसुलीत मनपाचे अधिकारी, कर्मचारी असले तरी त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत.