औरंगाबाद : शुक्रवारी मध्यरात्री दंगल उसळलेली असताना कंत्राटी पद्धतीवर अग्निशमन विभागात चालक म्हणून घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी वाहनावर जाण्यास चक्क नकार दिला. त्यांना त्वरित निलंबित करून दुसरे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर घेण्याचे आदेश सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. अग्निशमनच्या टँकरमधील पाणी संपल्यावर टँकरने पाणीपुरवठा झाला नाही. टँकर वेळेवर का पोहोचले नाहीत, याचाही खुलासा संबंधितांकडून मागविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दंगलीनंतर आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सिडको,पद्मपुरा, एमआयडीसी भागातील सर्व अग्निशमन विभागाची वाहने पाचारण करण्यात आली होती. ज्या दुकानांची आग विझवताना टँकरमधील पाणी कमी पडल्यास त्वरित टँकरद्वारे पाणी आणून देण्यात येते. अग्निशमनची वाहन परत पाणी भरण्यासाठी गेल्यास बराच वेळ लागतो. अग्निशमन अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाला टँकरद्वारे पाणी द्या, असे सांगितले होते. मात्र, महापालिकेचे टँकर शहागंजपर्यंत पोहोचलेच नाहीत. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागात कंत्राटी चालकांनी अग्निशमनचे वाहन दंगलीत चालविण्यास नकार दिला. मनपाच्या एका टँकरचालकाला गुलमंडीवर मारहाण करण्यात आली होती. या घटनेमुळे इतर चालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला होता. कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा त्वरित थांबवून दुसरे कर्मचारी नेमावेत, असेही घोडेले यांनी बजावले. बन्सिले यांचे प्राण वाचविता आले असते. मात्र अग्निशमन, पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सेवा चोखपणे बजावली नाही.
किल्ल्या कोणी पळविल्याशहागंज भागातील आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब गुलमंडीमार्गे येत असताना त्याला थांबविण्यात आले. चालकाला राजकीय मंडळींकडून मारहाण करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या वाहनाची किल्ली एका मोठ्या नेत्याने काढून घेतल्याची माहिती आहे. पोलीस या घटनेचेही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी या घटनेची पोलिसांकडे तक्रार का केली नाही, यावरही पोलीस यंत्रणा आश्चर्य व्यक्त करीत आहे.