औरंगाबाद : शहरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर केलेला निष्क्रियतेचा आरोप भाजपाकडून आज फेटाळून लावला आहे. तसेच दंगलीच्या या परिस्थितीचा खा. चंद्रकात खैरे हे राजकीय फायदा उचलत असल्याचा प्रत्यारोप भाजपाने पत्रकार परिषदेत घऊन केला.
११ व १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज पत्रकार परिषद घेतली. यात शिवसनेनेवर भाजपने जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यावरील निष्क्रियतेचा आरोप फेटाळून लावला. यासोबतच दंगलग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपतर्फे मदतफेरी काढण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेत आ. अतुल सावे, प्रवक्ता शिरिष बोराळकर, प्रदेश सचिव डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांची उपस्थिती होती.
खा. खैरेंची स्मरणशक्ती कमी पत्रकार परिषदेत बोलताना आ. अतुल सावे यांनी खा. खैरेंची स्मरणशक्ती कमी आहे; कारण दंगलीच्या काळात तेच माझ्या फोनवरून मुख्यमंत्र्यांशी बोलले अशी माहिती दिली. यासोबतच खा. खैरे हे दंगलीचा राजकीय लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहेत असा आरोपही यावेळी भाजपकडून करण्यात आला.
जुन्या शहरात दंगल होत असताना पोलीस खाते निष्क्रिय राहिले. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच दंगल भडकली, असा खळबळजनक आरोप खा. चंद्रकांत खैरे आणि संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. खा. खैरे म्हणाले, शुक्रवारी रात्री शहरात झालेली दंगल दोन्ही बाजूने नव्हे तर केवळ एकाच बाजूने घडलेली आहे. आम्ही लोकांचे व पोलिसांचे दंगेखोरांपासून संरक्षण केले. परंतु आता पोलीस आमच्या लोकांना अटक करीत आहेत. त्यामुळे पोलिसांवर आमचा विश्वास राहिला नाही. दंगलीच्या रात्री पोलिसांनी निष्क्रियता दाखविली, असा आरोपही खा. खैरे यांनी केला.