औरंगाबाद -किरकोळ कारणावरुन औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (11 मे) रात्री उशिरा दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर जाळपोळ, दगडफेकीत झाले.
सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शांतता ठेवा, तसेच सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. शिवाय, परिसरात इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे.
(जाळपोळीत दिव्यांगाचा होरपळून मृत्यू)
दरम्यान, जमावाने केलेल्या जाळपोळीत जगनलाल छगनलाल बन्सीले (वय 62 वर्ष, शहागंज) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शहागंज परिसरातील एका दुकानात जगनलाल शुक्रवारी (11 मे) झोपले होते. या हिंसाचारात शनिवारी (12 मे) पहाटे अज्ञातांनी त्या दुकानाला आग लावली. दुकानाच्या चहुबाजूंनी आग पसरली, तेव्हा आगीच्या झळांमुळे जगनलाल यांना जाग आली. या आगीतून जीव वाचवण्यासाठी त्यांनी आटापिटा केला. मात्र ते दिव्यांग असल्याने त्यांना दुकानातून बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट आपापसात भिडले. तलवारी, चाकू, लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी वाहनांची, दुकांनाची तोडफोड-जाळपोळ केली. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला. यामध्ये एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, जमावानं केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलीस जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवाय, जालन्याहून अतिरिक्त कुमकदेखील मागवण्यात आली आहे. दगडफेकीत 25 जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे.