औरंगाबाद : मागील आठवड्यात शहरातील मोती कारंजा, शहागंज, राजाबाजार या भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. मंगळवारी सकाळी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांची क्रांतीचौक पोलीस स्थानकात एसआयटीने चौकशीकरून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आतापर्यंतची ही पहिली मोठी अटक ठरली आहे.
शुक्रवारी रात्रभर मोती कारंजा शहागंज, राजाबाजार येथे मोठ्याप्रमाणावर हिंसाचार झाला होता. यात शेकडो दुकाने, वाहने जळून खाक झाली. तसेच दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आता सीसीटीव्हीचे फुटेज तपासात हिंसाचार करणाऱ्याची धरपकड सुरु केली आहे. यासाठीच आज सकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या शिवाजीनगर येथील घरी चौकशीसाठी गेले. याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी खासदार प्रदीप जैस्वाल हे शिवसैनिकांसह तेथे जमले. यामुळे या भागात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. वातावरण चिघळू नये म्हणून येथे पोलीस बदोबस्त वाढवत दंगल नियंत्रक वाहने पाचारण करण्यात आली.
यांनतर जिल्हाप्रमुख दानवे यांच्या गाडीतून जंजाळ क्रांतीचौक पोलीस स्थानकात चौकशीसाठी गेले. येथे एसआयटीने त्यांची चौकशीकरून त्यांना ताब्यात घेतले. हिंसाचार प्रकरणात ही पहिली मोठी कारवाई आहे. त्यांना दुपारी ३.३० वाजेदरम्यान कोर्टात नेण्यात येणार आहे.