औरंगाबाद : विरुद्ध बाजूने आमच्यावर जोरदार दगडफेक सुरू होती, दंगेखोरांना रोखण्यासाठी आम्ही धावलो, अन्यथा दंगेखोर गुलमंडी, सराफा, औरंगपुरा आणि पैठणगेटपर्यंतच्या भागात जाळपोळ आणि लुटालूट करण्याच्या तयारीत होते. एवढेच नव्हे तर दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आम्हीच रुग्णालयात दाखल केले, असा दावा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.
जुन्या शहरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून आरोपींची धरपकड सुरू केली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जातीय दंगल घडविण्यात आली. आमच्या घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. अनपेक्षितपणे दंगल करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. हे शहर १९८९ पासून शिवसेनाप्रमुखांमुळे शांत आहे. असे असताना एमआयएमकडून शहर डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ११ मे रोजी रात्री गांधीनगरात वाद झाल्याचे कळताच आम्ही तिकडे गेलो. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तेथे असताना मोतीकारंजा, नवाबपुरा, राजाबाजार येथे दंगेखोरांनी जाळपोळ आणि दगडफेक सुरू केल्याचे कळाले. तेथील रहिवासी प्रचंड घाबरले होते, त्यांनी आम्हाला फोन करून बोलावले.
शिवसेना, लच्छू पहिलवानला लोकांनी बोलावून नेले. आम्ही तेथे धावलो आणि दंगेखोरांना रोखून धरले, अन्यथा त्यांना गुलमंडी, औरंगपुरा ते पैठणगेटपर्यंत जाळपोळ आणि लुटालूट करायची होती. दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत आमचे सुमारे २५० लोक आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलीस अधिकारी गोवर्धन कोळेकर, रामेश्वर थोरात यांना आम्ही रुग्णालयात दाखल केले. पोलीस आयुक्त सकाळी ६ वाजता येथे आले तेव्हा त्यांच्यासमोर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते. तेव्हाच त्यांना तुम्हाला रोखता येत नसेल तर आम्ही रोखण्यास समर्थ असल्याचे सांगितले.
...तेव्हा कोठे होते विखे पाटील अन् झांबडदंगलीनंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ. सुभाष झांबड यांनी येथे येऊन आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले. दंगेखोर सामान्यांची घरे जाळत होते, तेव्हा कोठे होते विखे पाटील आणि झांबड. जैन मंदिराला आम्ही संरक्षण दिले. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचे येथे काय काम आहे, असा सवाल यावेळी खा.खैरे यांनी केला.
शिवसेनेवर कारवाई कराल, तर खबरदार..आम्ही दंगेखोरांच्या तावडीतून नागरिकांना वाचविले. दंगेखोरांवर कारवाई करण्याऐवजी आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. आमच्यावर कारवाई कराल, तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. या शिष्टमंडळात महापौर नंदकुमार घोडेले, माजी आ. प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ, राजेंद्र दानवे, संतोष खेंडके पाटील, राजू वैद्य, बाबासाहेब डांगे अन्य पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.