औैरंगाबाद : शहराचे आराध्य दैवत म्हणजे संस्थान गणपती होय. मंदिराच्या भिंतीलाच लागून निजामोद्दीन नामक व्यक्तीची २६ बाय ३० दुमजली इमारत होती. या इमारतीत माजी नगराध्यक्ष कै.बजरंगलाल शर्मा यांचा मुलगा गोविंद शर्मा आपल्या कुटुंबियांसह राहत होता. दंगेखोर समाजकंटकांनी त्यांच्या घराखालील दुकानांना आग लावली. या आगीत शर्मा यांच्या तीन पिढ्यांचा संसारही उद्ध्वस्त झाला.
पाच सदस्यांचे कुटुंब मागील ४८ तासांपासून मलब्याजवळ बसून आहे. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोणीही स्वीकारली नाही. मदतीसाठी रविवारी दिवसभर शर्मा कुटुंबिय प्रसारमाध्यमांसमोर मदतीसाठी याचना करीत होते. शर्मा ज्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते, त्या इमारतीच्या खाली अगरबत्ती, नारळ, अत्तर विक्रेते अलीभाईचे दुकान होते. मागील सहा दशकांमध्ये शहराने अनेक दंगली बघितल्या; पण अलीभाई आणि शर्मा कुटुंबियांमध्ये कधीच कटुता आली नाही. दोघे एकमेकांच्या मालमत्तेचे रक्षण करीत असत. या राम-रहीम संबंधात कटुता आणण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी शुक्रवारी मध्यरात्री केला. समाजकंटकांनी लावलेल्या आगीत संपूर्ण इमारत खाक झाली.
मुलांची कागदपत्रे मलब्यात अडकलीइमारतीचा मलबाही धराशायी झाला. या मलब्यात आपल्या घरातील काही महत्त्वाचे सामान, मुलांची कागदपत्रे सापडतात का याचा शोध घेण्याचा प्रयत्न गोविंद शर्मा करीत होते. बाहेरगावाहून त्यांचे नातेवाईक आले आहेत. नातेवाईकांसह मलब्याच्या बाजूलाच बसून, संपूर्ण कुटुंब जेवण करीत आहे. रात्री ओळखीपाळखीच्या मंडळींकडे महिला जाऊन झोपत आहेत. शर्मा आणि त्यांचा मुलगा बालाजी मंदिरात झोपत आहे. शर्मा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. स्वत: शर्मा एका दुकानात काम करतात. मोठी मुलगी मंजिरी शर्मा एका दुकानात सेल्समन म्हणून काम करते. दुसरी माधुरी शर्माही एका कंपनीत आहे. मुलगा शुभम शिक्षण घेत आहे. शर्मा यांची पत्नी गृहिणी आहे. दंगलीने संपूर्ण कुटुंबच उघड्यावर आले आहे. डोक्यावर छतही नाही. आमचे पुनर्वसन करावे, आर्थिक मदत करावी, अशी याचना शर्मा यांनी केली आहे.