औरंगाबाद: नाथसागरसारखे मोठे धरण लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः औरंगाबाद शहरात(Aurangabad city) तीव्र पाणी टंचाई भासत आहे. सध्या शहारातील नागरिकांना आठ ते नऊ दिवसातून एकदा पाणी दिले जाते. पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी नागरिकांना या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावरुन आता भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 23 मे रोजी औरंगाबाद शहरात भाजपच्या वतीने मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नेतृत्व स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) करतील.
आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. याबाबत सांगताना कराड म्हणाले की, सध्या औरंगाबाद शहरात भीषण पाणी टंचाई भासत आहे. आठ ते नऊ दिवसांनी स्थानिकांना पाण्याचा पुरवठा केला जातोय. यात लोडशेडींगमुळे हा पुरवठा अपुरा पडतोय. या सर्व कारणांमुळे औरंगाबादकरांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे. यामुळे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी निम्मी केली, पण त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाही.
पाणीपट्टी परत करण्याची मागणीहा जनतेचा रोष लक्षात घेऊन भाजपच्या वतीने येत्या 23 मे रोजी दुपारी शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करतील. या मोर्चात हजारो महिला पाण्याचे हंडे घेऊन सहभागी होतील. हा आक्रोश मोर्चा महापालिका आयुक्तालयावर धडकणार आहे, अशी माहिती कराड यांनी दिली. तसेच, यावेळी नागरिकांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली.
‘शिवसेनेसोबत भाजपाही जबाबदार’भाजपसह एमआयएमनेही पाणीपट्टीचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel ) यांनी केली आहे. तसेच, भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, मग त्यावेळेस हा प्रश्न का सोडवला नाही? तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते, असे इम्तियाज जलील म्हणाले.