औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाठ यांनी 40054 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना तब्बल 83099 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांना 43045 मते पडली. भाजप बंडखोर राजू शिंदे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत शिरसाट यांच्या विरोधात मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र सर्वदूर वैक्तिक संपर्क, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे ग्रामीण भागातील जाळे यामुळे शिरसाट यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. तसेच निवडणुकीत बाहेरचा उमेदवार हा मुद्दा सुद्धा गाजल्याने मतदारांनी शिरसाठ यांच्या विरोधकांना डावलले.
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसविना लढत झाली. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले राजू शिंदे, एमआयएमचे अरुण बोर्डे आणि वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आव्हान उभे केले होते. मात्र चौरंगी झालेल्या या लढतीत स्वच्छ प्रतिमा आणि शिवसेनेचा करिष्मा यावर संजय शिरसाट यांचा विजय सुकर झाल्याची राजकीय चर्चा आहे.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे दहा वर्षांपासून संजय शिरसाट हे प्रतिनिधित्व करीत आहेत. या विजयाने त्यांनी हटट्रिक साधली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. मात्र, त्याचवेळी एमआयएमच्या उमेदवारानेही लक्षणीय मते घेतली होती. त्यामुळे लोकसभेतील मताधिक्य राखण्याचे आव्हान संजय शिरसाट यांच्यासमोर होते.