औरंगाबाद : ऐतिहासिक, औद्योगिकदृष्ट्या औरंगाबाद शहराचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे तेथे विमानसेवा असणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन विमानसेवेच्या कनेक्टिव्हिटी औरंगाबादला देण्याबाबत आठवड्यात निर्णय होईल, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी भाजप शिष्टमंडळाला बुधवारी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री खा.रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री पुरी आणि सचिव प्रकाश करोला यांची भेट घेतली. या भेटीबाबत प्रवक्ते बोराळकर यांनी सांगितले, २५ विमानतळांच्या कनेक्टिव्हिटीची क्षमता औरंगाबाद विमानतळावर आहे. तरीही तेथे फक्त तीन विमान सध्या सेवा देत आहेत. उद्योग आणि पर्यटनाच्या दृृष्टीने शहराचे महत्त्व जागतिक पटलावर मोठे आहे. संध्याकाळच्या वेळेत विमानसेवा नाही. तातडीने विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने मंत्र्यांशी बोलताना व्यक्त केली.
यावर केंद्रीय मंत्री पुरी यांनी सचिव करोला यांना फोन करून विमानसेवेबाबत आढावा घेतला. तसेच शिष्टमंडळाला सचिव करोला यांनाही निवेदन देऊन परिस्थिती अवगत करण्यास सांगितले. करोला हे पर्यटन विभागाचे सचिव असताना त्यांनी अजिंठा लेण्यासाठी एका प्रकल्पावर काम केलेले असल्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. खाजगी विमानसेवा कंपन्यांशी तातडीने चर्चा करून सायंकाळच्या वेळेत विमान सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच एक थांबा देऊन इतर शहरांशी व राज्यांशी कनेक्टिव्हिटी देण्याबाबत विचार व्हावा. त्यामुळे जसे नागपूरहून जाताना विमाने एका ठिकाणी थांबतात. तसेच औरंगाबादहून एक थांबा देऊन विमाने सुरू केल्यास कंपन्यांना प्रवासी मिळतील, असेही मत शिष्टमंडळाने सचिवांकडे मांडले.