छत्रपती संभाजीनगर : जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्र आहेत. त्यामुळे सिल्लोड, फुलंब्री, पैठण या मतदारसंघांचा समावेश आहे. याच मतदानसंघांतील १० लाख ६ हजार ४८७ मतदार जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदार ठरविणार आहेत. खऱ्या अर्थाने हेच किंगमेकर मतदार असून, या निवडणुकीत त्यांचा कल महत्त्वाचा असणार आहे.
५ लाख २८ हजार ८०४ पुरुष तर ४ लाख ७६ हजार ६०८ महिला मतदारांचा या मतदारसंघात समावेश आहे. १ हजार ६३ सर्व्हिस मतदार आहेत. तर १२ इतर मतदार आहेत. जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण हे मतदारसंघ जालना मतदारसंघात आहेत. या तिन्ही मतदारसंघांपैकी शिंदेसेनेकडे दोन तर भाजपकडे एक आमदार आहे. ग्रामीण आणि शहरी मतदारांचा कल कसा असेल हे आत्ताच सांगणे अवघड असून, यावेळी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे फुलंब्रीचे माजी आ. डॉ. कल्याण काळे यांच्यात थेट लढत होत आहे.
या निवडणुकीत किती आहेत मतदार?सिल्लोड.....३,४०,४२४फुलंब्री.....३,५२,१६०पैठण.....३,१३,०९३एकूण....१०,०६,४८७
२०१९ च्या निवडणुकीचा निकाल असा...केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे भाजपकडून तर विलास औताडे हे काँग्रेसकडून मैदानात होते. दानवे यांना ६ लाख ९८ हजार १९ मते मिळाली होती. तर औताडे यांना ३ लाख ६५ हजार २०४ मते मिळाली होती. यात सिल्लोडमधून औताडे यांना ४४,९८८, फुलंब्रीतून ६६,२७९, पैठणमधून ६८,१२४ मते मिळाली होती. तर दानवे यांना पैठणमधून १ लाख ९ हजार ६२८, फुलंब्रीतून १ लाख १९ हजार १३९, सिल्लोडमध्ये १ लाख २४ हजार ८१३ मते मिळाली होती.पूर्ण मतदारसंघातून भाजपला काँग्रेसपेक्षा ३ लाख ३२ हजार ८१५ जास्त मते मिळाली होती.
औरंगाबाद मतदारसंघातून किती मते मिळाली?औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला पोस्टल मतांसह १,८०,३३७ मते मिळाली होती. तर भाजपला ३ लाख ५६ हजार ६५४ मते मिळाली होती. नोटासह २० उमेदवार मैदानात होते. गेल्या वेळी शिवसेनेची ताकद भाजप उमेदवारासोबत होती. यंदा ती संघटन ताकद काँग्रेस उमेदवारासोबत आहे.
मतदारसंघावर प्राबल्य कुणाचे?सिल्लोड मतदारसंघावर पणनमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व असून, ते शिंदेसेनेचे आहेत. फुलंब्री मतदारसंघावर भाजपचे आ. हरिभाऊ बागडे यांचे प्राबल्य आहे. तर पैठण मतदारसंघावर पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे वर्चस्व असून, ते सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात आहेत.