औरंगाबाद : शनिवारी, रविवारी जायकवाडी, फारोळा येथे वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. रविवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही, त्यांना सोमवारी पाणी देण्यात आले. शहरातील बहुतांश वॉर्डांमधील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात तब्बल आठ ते नऊ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता वादळामुळे जायकवाडी, फारोळा येथील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद झाल्या. दोन तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. यानंतर रात्री दहा वाजता नक्षत्रवाडी एमबीआर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. पुन्हा ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा जायकवाडीतून बंद करावा लागला. सोमवारी पहाटे दोन वाजता वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर जायकवाडीतून पुन्हा पंपिंग सुरू करण्यात आले. ते पाणी एमबीआरपर्यंत आल्यानंतर एमबीआरचे पंप पहाटे चार वाजता सुरू करण्यात आले.
दरम्यानच्या काळात सुमारे सहा तास जुन्या जलवाहिनीद्वारे शहराला येणारे पाणी बंद होते. याचा परिणाम सोमवारी जुन्या शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला. सोमवारी दिवसभरातील पाणीपुरवठ्याचे चार ते पाच तास पुढे ढकलण्यात आले. सोमवारी रात्री बारा ते एक वाजेपर्यंत पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू ठेवणार असल्याचे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन दिवस लागणार आहेत. सिडको-हडकोत सर्वाधिक पाणीटंचाई आहे. जाधववाडी, मयूर पार्क, मयूरनगर, सुदर्शननगर, सिद्धार्थनगर, टी.व्ही. सेंटर, जयभवानीनगर, अंबिकानगर, मुकुंदवाडी, रामनगर आदी भागांत सातव्या आणि आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे.
शहागंजचे १६ वॉर्ड दुर्लक्षितशहागंजच्या पाण्याच्या टाकीवर १६ वॉर्ड अवलंबून आहेत. काही वॉर्डांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीवरून १८ ते २० तासांचे सप्लाय ठेवण्यात आले आहेत. १८ तास ज्या लाईनवरून नागरिकांनी थेट कनेक्शन घेतले आहेत, त्यांना २० तास पाणी मिळत आहे. येथील बहुतांश वॉर्डांना सातव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शनिवारी, रविवारी जायकवाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वाधिक त्रास शहागंज पाण्याच्या टाकीवरील वॉर्डांना होत आहे.
मरीमाताजवळील टाकीला १० एमएलडीसिडको एन-५ येथील टाकीवरून मरीमाता पाण्याच्या टाकीला १० एमएलडी पाणी देण्यात येते. या टाकीवर किती वॉर्ड अवलंबून आहेत. या वॉर्डांना किती तास पाणी देण्यात येते. अवघ्या ७ वॉर्डांसाठी दहा एमएलडी पाणी कसे काय लागत आहे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.