औरंगाबाद : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद मनपा हद्दीतील महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अॉनलाईन नोंदणीची मुदत सोमवारी (दि.२५) संपली. अकरावीच्या प्रवेशासाठी २२ हजार १५ विद्यार्थ्यांनी भाग-१ ची नोंदणी केली, तर भाग-२ नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १९ हजार १५९ एवढी आहे. शहरातील ११२ महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विना अनुदानित, कायमविना अनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यीत जागांची संख्या ही २८ हजार ७३५ आहे. यामुळे अकरावी प्रवेशासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी आणि उपलब्ध जागांची संख्या पाहता जवळपास १० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
अकरावीतील कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी भाग-१ आणि २ भरणे बंधनकारक होते. यासाठी सोमवारपर्यंत (दि.२५) मुदत देण्यात आली होती. यात औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी भाग-१ भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २२ हजार १५ एवढी असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. मात्र, याचवेळी भाग-२ भरणे विद्यार्थ्यांना बंधनकारक होते. भाग-२ भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र १९ हजार १५९ एवढी आहे. यामुळे महाविद्यालयातील उपलब्ध जागा आणि नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या पाहता अकरावीच्या दहा हजारांपेक्षा अधिक जागा रिक्तY राहण्याची शक्यता आहे. अकरावीतील प्रवेशाच्या अॉनलाईन नोंदणीला कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी दिली.
बायफोकल विषयांसाठी आज १ वाजेपर्यंत प्रवेशअकरावीच्या बायफोकल विषय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश घेण्याची मुदत २२ जूनपर्यंत होती. मात्र, या कालावधीत काही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन ११ वी अॉनलाईन प्रवेशांच्या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत अपलोड करण्याचे आवाहन सहायक शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख यांनी केले आहे.