औरंगाबाद : जग बौद्ध धम्माकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. अशा वेळी औरंगाबादनजीक आंतरराष्ट्रीय लोकुत्तरा धम्म प्रशिक्षण केंद्र उभे राहिले. या केंद्रातून आता पुरेसे प्रशिक्षित भिक्खू उपलब्ध होतील. यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील धम्म चळवळीला गती मिळेल, असा विश्वास विविध देशांतून आलेल्या भिक्खूंनी व्यक्त केला. जगभरातील बौद्ध राष्ट्र या केंद्रासाठी आवश्यक ते सहकार्य करतील, असा शद्बही त्यांनी दिला.नागसेनवन परिसरात आयोजित तीनदिवसीय जागतिक धम्म परिषदेचा समारोप रविवारी रात्री भिक्खू संघाच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाला सुमारे बारा देशांसह राज्याच्या विविध भागांतील भिक्खूंची उपस्थिती होती. भदन्त संघसेना यांनी परिषदेच्या संयोजकांचे कौतुक केले. श्रीलंका, थायलंड आदी देशांच्या तुलनेत येथे साधनांची कमतरता आहे. मात्र, त्यावरही मात करीत ही परिषद ऐतिहासिक ठरल्याचे ते म्हणाले. भदन्त सदानंद महास्थवीर म्हणाले की, मागील तीन दिवसांत बौद्ध तत्त्वज्ञानाबरोबरच अनेक गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर येथे चर्चा झाली. चर्चेचे केवळ श्रवण न करता या परिषदेने दिलेले विचार आत्मसात करा.डॉ. सुमेधो यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्यामुळेच या देशातील वंचितांना माणुसकीचे हक्क मिळाल्याचे सांगून बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र आपण अंगीकारला. आज त्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. भारतातील सर्वाधिक साक्षर समाज बौद्ध असून, इतर क्षेत्रातही तो आघाडीवर आहे. बुद्ध धम्माला आणखी गती मिळाल्यास या देशाला पुन्हा सोन्याचे दिवस येतील, असे ते म्हणाले.श्रीलंकेचे जीनरत्न महास्थवीर यांनी जगाला ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ असल्याचे सांगितले. भारताचे कधीकाळी जम्बोदीप असे नाव होते. अशोकाच्याकाळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा देश बुद्धमय होता. त्यामुळेच भारतातच नव्हे तर जगात कुठेही इतिहास खोदाल तर तेथे बुद्धच आढळून येईल, असे म्हणाले.भन्ते मेनेरिका यांनी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळ्यानंतरचा भव्यदिव्य कार्यक्रम म्हणून या धम्म परिषदेची नोंद होईल. आपण परिषदेसाठी श्रम, वेळ, पैसा दिला. यावेळी डॉ. देवेंद्र (म्यानमार), डॉ. प्रमाहा केराती (थायलंड), डॉ. लि (कोरिया), डॉ. धम्मकीर्ती (अरुणाचल प्रदेश) डॉ. सुमेधो यांनीही मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांची उपस्थिती होती.कांबळे दाम्पत्याचा विशेष गौरवअतिशय नेटके नियोजन करीत, कमी वेळेत सर्वांना सोबत घेऊन मुख्य संयोजक हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच यांनी औरंगाबादेतील ही धम्म परिषद यशस्वी करून दाखविली. धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी कांबळे दाम्पत्य घेत असलेले परिश्रम मोलाचे आणि प्रेरणादायी असल्याचे सांगत, भिक्खू संघाच्या वतीने धम्मवस्त्र देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या तीनदिवसीय जागतिक धम्म परिषदेच्या एकाही फलकावर कांबळे यांचे छायाचित्र नव्हते. धम्म आणि चळवळीविषयीची त्यांचीतळमळ आणि प्रामाणिकपणाच यावरून दिसून येतो, असेही भदन्त संघसेना म्हणाले.
धम्म चळवळीला औरंगाबाद गती देईल, जागतिक परिषदेचा समारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 7:31 AM