औरंगाबाद : केंद्र सरकारने आयोजित केलेल्या स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजमध्ये देशभरातील ११३ शहरांमध्ये औरंगाबादने पहिल्या ११ मध्ये स्थान मिळवून स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज जिंकले. स्मार्ट सिटीज मिशनने सोमवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या यशाबद्दल शहराला ५० लाख रुपयांचे बक्षीसही मिळणार आहे.
रस्त्यांवर चालणे सर्वांसाठी अनुकूल, सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्मार्ट सिटीज मिशनद्वारे स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज सुरू करण्यात आले होते. या मोहिमेचा एक भाग म्हणून क्रांती चौक आणि कॅनॉट परिसरात पायलट प्रकल्प राबविले.
स्ट्रीट्स फॉर पीपल अंतर्गत औरंगाबादने पैठण गेट, क्रांती चौक आणि कॅनॉट येथे ओपन स्ट्रीट कार्यक्रम आयोजित केले होते. नागरिकांना वाहनमुक्त रस्त्यांचा अनुभव देण्यासाठी रस्त्यांवर वाहतूक बंद करण्यात आली होती. स्मार्ट सिटीने ४ रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी डिझाइन तयार केले आहे. क्रांती चौक ते गोपाळ टी, पैठण गेट ते गुलमंडी, कॅनॉट आणि प्रियदर्शनी एमजीएम स्ट्रीट येथे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.
सोमवारी केंद्र शासनाने या प्रकल्पातील प्रमुख अकरा शहरांची घोषणा केली, त्यामध्ये औरंगाबादचा समावेश करण्यात आला. औरंगाबादने नवी दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, सुरत, जयपूर, भोपाळ, नाशिक आणि ठाणे या मोठ्या शहरांना मागे टाकले. या यशाबद्दल स्मार्ट सिटीला ५० लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
देशभरातील ११३ शहरांमध्ये औरंगाबाद शहराची प्रमुख अकरामध्ये निवड होणे ही फार मोठी बाब आहे. हे मोठे यश असून या शहराची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. याचे श्रेय औरंगाबादचे नागरिक, स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेला जाते. निवडक रस्त्यांवर औरंगाबादला आधुनिक स्वरूप देण्यासाठी परिवर्तनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- अस्तिककुमार पाण्डेय, सीईओ, स्मार्ट सिटी औरंगाबाद.